आर्य मूळ भारतीयच! डेक्कन कॉलेजचे संशोधन : डीएनद्वारे सिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:26 AM2019-09-07T06:26:13+5:302019-09-07T06:26:18+5:30

आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले, यावर वाद-विवाद झडत असतात.

Aryans are native Indians! Deccan College Research: Proven by DNA | आर्य मूळ भारतीयच! डेक्कन कॉलेजचे संशोधन : डीएनद्वारे सिद्ध

आर्य मूळ भारतीयच! डेक्कन कॉलेजचे संशोधन : डीएनद्वारे सिद्ध

googlenewsNext

पुणे : आर्य बाहेरून आले व त्यांनी ‘हडप्पा संस्कृती’चा विकास केला हा ब्रिटिश व काही भारतीय इतिहासकारांनी रुढ केलेला समज डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने संशोधनाद्वारे खोटा ठरविला आहे. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि त्यांनीच ‘हडप्पा संस्कृती’ निर्माण केली असल्याचे ठोस पुरावे डीएनए आणि पुरातत्वशास्त्राचा आधारे मिळाले असल्याचा दावा डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी केला.

आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले, यावर वाद-विवाद झडत असतात. हडप्पा संस्कृतीच्या काळात दक्षिण आशियात बाहेरून स्थलांतरे झाली, हा दावा प्राचीन डीएनएच्या नव्या संशोधनाने खोडून काढला आहे. हडप्पातील लोकसंख्येचे मूळ प्राचीन इराणी शेतकऱ्यांमध्ये सापडत असल्याचा दावाही नव्या डीएनए संशोधनाने खोटा ठरवला आहे. सन २०११-१२ पासून डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राखीगडी येथे अांतरराष्ट्रीय प्रकल्पाची सुरुवात झाली. हरयाणा सरकारच्या पुरातत्व व संग्रहालय विभागाने उत्खनन केले. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायलॉजी ( सीसीएमबी)चे डॉ. नीरज पै व अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल आॅफ मेडिसीन विभागातील प्रा. डेव्हिड रिच यांनी प्राचीन डीएनचा अभ्यास केला. यातून नव्याने समोर आलेले निष्कर्ष ‘आर्य बाहेरुन आले,’ या मांडणीला छेद देणारे आहेत.

‘लोकमत’ला डॉ. शिंदे यांनी सांगितले की, डीएनए व पुरातत्वीय पुराव्यांचे आधारे स्पष्ट होते, की येथील विकास स्वदेशी लोकांनीच केला. आर्य हे मुळात भटके होते. दहा ते बारा हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या जमाती राखीगडी भागात स्थिरस्थावर झाल्या. त्यांच्यात कालपरत्वे विकास होत गेला. याच लोकांची पुढे हडप्पा संस्कृती झाली आणि त्यांनीच नागरीकरण केले, याचे पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. सध्याच्या बंगाल ते अफगाणिस्तान आणि काश्मीर ते अंदमानपर्यंतची लोकसंख्या ही जात, धर्माच्या आधारावर हडप्पा संस्कृतीवर आधारित आहे. आर्य लोक बाहेरून आले आणि त्यांनी हडप्पन लोकांवर अतिक्रमण केले असे मानायचे म्हटले तर आर्यांनी आणलेली बाहेरची संस्कृतीही त्यांच्यासोबत आली असती. त्याचे धागेदोरे मिळत नाहीत. आमच्या संशोधनामुळे पूर्वीची थीअरी बदलली जाणार असून, इतिहासाला नवी दिशा मिळाली आहे.

प्राध्यापक डेव्हीड रिच यांच्यासमवेत जर्मनीचे काही शास्त्रज्ञ होते. त्यांचे आणि आमचे अनुमान यात साम्य आहे. हा शोधनिबंध परदेशी जर्नलमध्ये प्रसिद्ध केला. तिथे आमचे संशोधन त्यांनी स्वीकारले आहे. आर्य ही भाषिक संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.
नवा प्रकाश हडप्पा संस्कृतीमधील लोक हेच दक्षिण अशियातल्या लोकसंख्येचे पूर्वज असल्याचे तथ्य प्राचीन डीएनएच्या अभ्यासातून पहिल्यांदाच उजेडात आले आहे. या संशोधनाने पहिल्यांदाच असे सिद्ध केले आहे, की प्राचीन काळातले स्थलांतर हे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाले नसून पूर्वेकडून पश्चिमेला झाले आहे. हडप्पा संस्कृतीतल्या लोकांचे मेसोपोटेमिया, इजिप्त, पर्शियाचे आखात तसेच जवळपास संपूर्ण दक्षिण आशियाशी व्यापारी संबंध होते. भारत व दक्षिण आशियातील कृषी संस्कृती मध्य अशिया किंवा पश्चिमेकडून आली नाही, तर ती इथेच तयार झाली. यासारख्या बाबी यापूर्वीच्या समजांना पूर्णत: छेद देणाऱ्या आहेत.

अतिक्रमणाची थापच
आर्यांनी भारतात स्थलांतर केले किंवा आर्य टोळ््यांनी भारतावर आक्रमण केले, ही समजूत नाकारणारे पुरावे आढळले आहेत.
मोहेंजोदारोच्या गडातील वरच्या भागात आढळलेल्या सापळ््यावरून ती व्यक्ती आर्यांच्या आक्रमणात मारली गेल्याचे गृहितक सर मॉर्टीमायर व्हिलर यांनी मांडले होते. प्रत्यक्षात ही व्यक्ती पुरात बुडून मृत्युमुखी पडल्याचे सिद्ध झाले आहे.

Web Title: Aryans are native Indians! Deccan College Research: Proven by DNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.