छगन भुजबळांनी पातळी सोडल्याने त्यांना विरोध राहणार- मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 02:02 PM2023-11-21T14:02:03+5:302023-11-21T14:06:18+5:30
समाजात तेढ निर्माण करण्याचे स्वप्न साकार होऊ देऊ नका...
देहूगाव (पुणे) :छगन भुजबळ यांना व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. मात्र, त्यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्यामुळे आता त्यांना आमचा व्यक्तिगत विरोध राहील. सध्या ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी थेट बोलतात. मराठा नेत्यांनीही मराठा समाजातील मुलांच्या भविष्यासाठी थेट बोलले पाहिजे, असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काही नेत्यांचे प्रयत्न आहेत, त्यांचे हे स्वप्न साकार होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री क्षेत्र देहूगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत जरांगे-पाटील बोलत होते. तत्पूर्वी फटाक्य़ांच्या आतषबाजीत व फुलांची उधळण करीत मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. परिसरातील सकल मराठा समाज त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता. जरांगे-पाटील म्हणाले, मराठ्यांनो भानावर या. सावध राहा, बेसावध राहू नका. बेसावध राहिला तर न्याय मिळणार नाही. तुम्हाला दूरदृष्टी ठेवायला हवी. ज्यांचे ४० -४० वर्षे विचार पटत नव्हते ते राजकीय स्वार्थासाठी एका रात्रीत एकत्र आले. जर राजकीय मंडळी एकत्र येऊ शकतात तर तुमच्या लेकरांच्या स्वार्थासाठी तुमचे मतभेद सोडून तुम्ही एकत्र का येत नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपल्या लेकरांच्या हितासाठी मराठा समाजाने एकजूट ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठ्यांच्या मुलांच्या आरक्षणाचा घास तोंडाला आलेला आहे, तो जाऊ नये म्हणून शांत बसलो आहे व तुम्हाला विनंती आहे की आपण शांत राहायचे आहे. त्यांनी कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी उचकायचे नाही. त्यांनी कितीही भडकाऊ वक्तव्य केले तरीही आपण एकमेकांच्या अंगावर जायचे नाही.
यानंतर त्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी असे साकडे घातले. नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, सचिन हगवणे, स्वप्नील काळोखे, अजित काळोखे, प्रशांत काळोखे, गोरख काळोखे, ओंकार काळोखे, विवेक काळोखे, सनी काळोखे, स्वप्नील हगवणे, सुदर्शन काळोखे, अमोल मोरे, किशोर आवळे, बंटी मुसुडगे, अनिकेत काळोखे, गणेश मराठे, निखील मराठे, शुभम शेवाळे, दीपक काळोखे व सकल मराठा समाजाने संयोजन केले होते.