अवघ्या ९ महिन्यांत तब्बल १३ कोटींचे ड्रग्ज जप्त; तरुणाईला विळखा; पुण्यासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:32 PM2024-06-26T12:32:35+5:302024-06-26T12:33:24+5:30

रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जातीये

As many as 13 crore drugs seized in just 9 months; Abandon the youth; Alarm bells for Pune | अवघ्या ९ महिन्यांत तब्बल १३ कोटींचे ड्रग्ज जप्त; तरुणाईला विळखा; पुण्यासाठी धोक्याची घंटा

अवघ्या ९ महिन्यांत तब्बल १३ कोटींचे ड्रग्ज जप्त; तरुणाईला विळखा; पुण्यासाठी धोक्याची घंटा

नम्रता फडणीस 

पुणे : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आला आहे. पुण्यातील तरुणाई आज अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव आहे. रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जात आहे ! शहरात गेल्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यांत विक्रमी १३ कोटींचे अमली पदार्थ गुन्हे शाखेने जप्त केले असून, ही देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांनीपुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगलीत छापे टाकून तब्बल साडेतीन हजार कोटींचे १७०० किलो रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. आता फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ पबमध्ये तरुणाई अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्याने पुण्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, ड्रग्ज वितरणाची साखळी तोडण्यात पोलीस काही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत आहे. पूर्वी अफीम, कोकेन, गांजा, चरस याच्या आहारी जाणाऱ्या तरुणांमध्ये आता नशेचा ट्रेंडदेखील बदलला आहे. आता कोकेन, मेफेड्रोन (एम.डी), एलएसडी स्टॅम्प, एमडीएमए, मशरूम आणि हशिश तेल याचा वापर नशेसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून समोर येत आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी सव्वाकोटी रुपयांचे एलएसडी स्टॅम्प जप्त केले होते. ही स्टॅम्पची नशा करण्यात नामांकित महाविद्यालयीन तरुण होते. त्यामुळे पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये ७ कोटी १४ लाख २४ हजार रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. त्या तुलनेत गेल्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यात पुणे पोलिसांना १३ कोटींचा विक्रमी अमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले.

पोलिसांची कारवाई का थंडावते?

ललित पाटील ड्रग्ज रॅकेटनंतर पोलिसांनी ड्रग्जचा साठा उत्पादन त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली. आता पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी अनधिकृत पबची यादी महापालिका प्रशासनाला कळविली. त्यापैकी काही पबवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र महिन्यानंतर पुन्हा महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई थंड झाली. या कारवाया अधूनमधून थंड का होतात? असा सवाल पुणेकर विचारू लागले आहेत. 

कोडवर्डने ऑनलाइनही मिळते ड्रग्ज

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार वाढले असल्याने अंमली पदार्थाची विक्रीदेखील सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. याशिवाय सोशल मीडियावर विशिष्ट कोडवर्डचा वापरही केला जात आहे. डिजिटल माध्यमावरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि डिलिव्हरीचे स्केटही धसास लावले जात असल्याचे पोलिस सांगत आहेत. असे असतानाही तरुणाईला अंमली पदार्थ सहजपणे कसे उपलब्ध होतात? याबाबत पोलिसांकडे कोणतेच उत्तर नाही.

यंदाही ७१ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

गतवर्षी १३५ दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जवळपास १८३ आरोपींना कारागृहाची हवा दाखविली आहे. यंदा मेअखेर ४६ गुन्ह्यात ७१ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

शहरात सर्वाधिक मेफेड्रोनची कारवाई

शहरात सर्वाधिक तीन कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मेफेड्रोनची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अफिम व कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे.

पुण्यातील महत्त्वाच्या घटना
२०२२
शहर पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील २१ पोलिस ठाण्यातील जप्त केलेले ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गांजा, एमडी, कोकेन, चरस, पॉपीस्टी आणि हेरॉईनचा समावेश होता.

२०२३
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ किलो ७५ ग्रॅमचे तब्बल दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. ड्रग माफिया ललित पाटील याच्यामुळे पोलिसांचे छापासत्र सुरू झाले.

२०२४
सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये ३०० कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, परिसरातही छापे टाकून साडेतीन हजार कोटी रुपयांचे १७०० किलो रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पुण्याजवळील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मेफेड्रोन तयार करण्यात आले. ते थेट दिल्लीतून कुरिअरद्वारे लंडनला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर देशपातळीवरील तपास यंत्रणांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.

पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात केलेली कारवाई (एनडीपीएस ॲक्टनुसार दाखल गुन्हे)
वर्ष -             जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत (रुपयांत)

२०१९                         ३ कोटी ८१ हजार ७९७
२०२०                         १ कोटी ९५ लाख ०८ हजार ६१६
२०२१                         २ कोटी ५८ लाख २९ हजार
२०२२                         ७ कोटी १४ लाख २४ हजार
२०२३                         १३ कोटी ६१ लाख
२०२४ (मेअखेर) ३५०० कोटी १८ लाख ८६ हजार

Web Title: As many as 13 crore drugs seized in just 9 months; Abandon the youth; Alarm bells for Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.