'गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ...' पुण्यातील तब्बल २० हजार शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:49 PM2022-08-24T14:49:44+5:302022-08-24T14:49:52+5:30
शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन शिवसैनिक स्वतःहून प्रतिज्ञापत्र भरत आहेत
केडगाव : पुणे जिल्ह्यातील २० हजार शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे भरून देत आम्ही शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन शिवसैनिक स्वतःहून प्रतिज्ञापत्र भरत आहेत. राष्ट्रवादी व त्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘माझी शिवसेनेच्या संविधानावर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. या निष्ठेची मी पुन:श्च पुष्टी करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही प्रतिज्ञापत्राद्वारे देतो’, अशी हमी शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे.
जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले, जिल्ह्यातील कोणीही शिंदे गटासोबत गेले नाही. सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. येणाऱ्या काळात गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, हे आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेतून दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल. शिवसेना कार्यकर्ते समीर भोईटे म्हणाले, जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक पेटून उठले आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये भगवा फडकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. ‘गाव तिथे शिवसेना’ घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. इंदापूरचे तालुका युवा सेना अधिकारी सचिन इंगळे म्हणाले, ‘आमच्या तालुक्यातील फक्त एकजण शिंदे गटामध्ये गेला आहे. इंदापूर तालुका सर्व ताकदीनिशी शिवसेनेच्या पाठीशी आहे. पक्षाचे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे, निकाल आमच्याच बाजूला लागणार आहे. सत्य लवकरच बाहेर येईल.’