तब्बल ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; ईडीच्या नावाचा वापर करून घातला गंडा

By विवेक भुसे | Published: May 16, 2023 04:36 PM2023-05-16T16:36:27+5:302023-05-16T16:36:43+5:30

देशभरातील राजकीय क्षेत्रात विशेषत: विरोधकात ईडीची दहशत निर्माण झाल्याचा गैरफायदा फसवणुक करणारे घेऊ लागल्याचे दिसून आले

As many as 450 investors were defrauded of crores Scam by using ED name | तब्बल ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; ईडीच्या नावाचा वापर करून घातला गंडा

तब्बल ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; ईडीच्या नावाचा वापर करून घातला गंडा

googlenewsNext

पुणे: दुबई, सिंगापूरला कार्यालये असल्याचे सांगून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने ठेवी गोळा केल्या. पैसे परत करण्याची वेळ आली, तेव्हा ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) सर्व बँक खाती गोठवल्याचे सांगून रेहान एंटरप्रायजेसने साडेचारशे गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्यानंतर रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांवर एमपीआयडी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, मुंबईस्थित रेहान एंटरप्रायझेसने आम्ही क्रिस्टो करन्सी, शेअर मार्केट, फॉरेक्समध्ये गुंतवणुक करतो. दुबई, सिंगापूर येथे कार्यालये आहेत, असे सांगून लोकांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी १७ लाख रुपये गुंतवले. त्यातील ९ लाख ४४ हजार रुपये त्यांना परत मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. ३० ऑगस्ट २०२२ रोजी महादेव जाधव याने झुम मिटिंग घेतली. त्याला ४५९ गुंतवणुकदार उपस्थित होते. या मिटिंगमध्ये त्याने रेहान एंटरप्रायझेसची सर्व बँक खाती ईडीने गोठवली आहेत. त्यामुळे पुढील ३ महिने कोणालाही मुद्दल व व्याज मिळणार नाही. खाती सुरु झाल्यावर सर्वाची रक्कम परत करतो. कोणी पोलीस तक्रार केली तर मला आत जावे लागेल. त्यामुळे कोणालाही पैसे मिळणार नाही, असे सांगितले.

त्यानंतर दर महिन्याला तो नवे नवे वादे करत राहिला. नवीन करारनामे सर्वांना पाठविले. मार्च २०२३ पर्यंत सर्वांची रक्कम देणार, असे सांगून तो झुलवत राहिला. त्यानंतर महादेव जाधव याचा नंबर बंद लागतो. तसेच त्याचे पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, लातूर येथील सर्व ऑफिसेस बंद झाली आहेत.

त्यानंतर आता गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महादेव जाधव व इतरांनी तब्बल ४५९ हून अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यापैकी काही जणांची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे आली आहे.

ईडीचा असाही वापर

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी या केंद्रीय संस्थेचा सध्या बराच बोलबाला आहे. आपल्या विरोधकांना नमविण्यासाठी सत्ताधारी ईडीची चौकशी लावत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून राज्यात तसेच देशभरातील राजकीय क्षेत्रात विशेषत: विरोधकात ईडीची दहशत निर्माण झाली आहे. याचा गैरफायदा फसवणुक करणारे घेऊ लागल्याचे दिसून येत आहे. महादेव जाधव यानेही गेल्या ऑगस्टपासून गुंतवणुकदारांना ईडीचे नाव सांगून झुलवत ठेवले आहे.

Web Title: As many as 450 investors were defrauded of crores Scam by using ED name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.