पुण्यात २१ विधानसभांसाठी तब्बल ४६५ फेऱ्या; एका फेरीला २० मिनिटं, ३ पर्यंत निकाल हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:45 PM2024-11-22T14:45:58+5:302024-11-22T14:46:13+5:30
पुरंदर मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजेच ३० फेऱ्या तर आंबेगाव मतदारसंघासाठी सर्वांत कमी म्हणजेच १९ फेऱ्या होणार
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २३) होणाऱ्या मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार असून दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी माहिती जिल्हाधिकारी ड़ॉ. सुहास दिवसे यांनी दिली. यासाठी तयारी पूर्ण झाली असून सुमारे २ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुरंदर मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजेच ३० फेऱ्या तर आंबेगाव मतदारसंघासाठी सर्वांत कमी म्हणजेच १९ फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणीच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘सुरुवातीला पोस्टल व इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट या मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २४ टेबल ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम मोजणीसाठी ३९१ टेबल ठेवण्यात आले आहेत. तर पोस्टल मतांसाठी ८७ टेबल असतील. एका टेबलवर किमान ४०० मते मोजणीसाठी असतील. ईव्हीएमच्या एका फेरीसाठी साधारण २० मिनिटे लागणार आहेत. यासाठी २ हजार २३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात सूक्ष्म निरीक्षक ५२८, मतमोजणी पर्यवेक्षक ५५३ तर मतमोजणी सहायक ५७७ असतील.’
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या गोदामात होणार आहे. तर पिंपरी, भोसरी मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे तर चिंचवड मतदारसंघातील कामगार भवन येथे होणार आहेत. शिरूर मतदारसंघातील मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी येथे होणार असून उर्वरित ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
एक टेबलसाठी दोन पर्यवेक्षक, तीन सहायक असे पाच मतमोजणी कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक नेमून देण्यात आला आहे. मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. सुरुवातीला टपाली मते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मते मोजली जाणार आहेत.
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित राहू शकतात. स्ट्राँग रूम तसेच मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. तेथील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर काढताना आणि मतमोजणीनंतर परत ठेवताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. फेरीनिहाय मोजणीची घोषणा करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी स्ट्राँग रूमला केंद्रीय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था असणार आहे.
मतदारसंघ फेऱ्या
जुन्नर २०
आंबेगाव १९
खेड आळंदी २०
शिरूर २०
दौंड २३
इंदापूर २५
बारामती २०
पुरंदर ३०
भोर २४
मावळ २९
चिंचवड २४
पिंपरी २०
भोसरी २२
वडगाव शेरी २२
शिवाजीनगर २०
कोथरुड २०
खडकवासला २५
पर्वती २०
हडपसर २२
पुणे कॅन्टोमेंट २०
कसबा पेठ २०
एकूण ४६५