Pune Crime| भावी पतीचा ऑनलाइन शोध पडला तब्बल ८ लाखाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:20 AM2023-05-22T10:20:26+5:302023-05-22T10:21:01+5:30
आर्थिक गंडा घालणाऱ्या ताेतयाविराेधात महिलेने सांगवी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली...
पुणे : ‘मॅट्रिमाेनियल साइटवरून’ संपर्कात आलेल्या ताेतया विवाहेच्छुक तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेला ८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच पुण्यात उघडकीस आला. ब्रिटनमध्ये स्थायिक असून, आपण भेटावयास येणार असल्याचे सांगून आर्थिक गंडा घालणाऱ्या ताेतयाविराेधात महिलेने सांगवी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.
एका मॅट्रिमाेनियल साइटवर स्वत: ची नोंदणी करणाऱ्या महिलेने सुमारे दोन महिन्यांपूर्वी यूकेमध्ये स्थायिक झालेल्या पुरुषाची प्रोफाइल पाहिली होती. महिलेने पुरुषाशी बराच काळ संवाद साधल्यानंतर त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकमेकांच्या कुटुंबांची वैयक्तिक माहितीची आणि तपशीलांची देवाणघेवाण केली. १ मे रोजी पुरुषाने तिला सांगितले की, मी सिंगापूरला मिटिंगसाठी जात आहे आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याला थांबणार आहाेत. त्याने तिला सांगितले की, त्याने त्याचे सामान तिच्या पत्त्यावर पाठवले आहे, जेणेकरून ते अगोदर पोहोचावे. त्याने तिला बॅगचा फोटो आणि कुरिअर कंपनीची पावतीही पाठवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
त्यांनतर महिलेला सीमा शुल्क आकारण्याची मागणी करणारा कॉल आला. महिलेने ५८ हजार रुपये भरल्यानंतर बॅगमधील सोने, विदेशी चलन आणि उच्च श्रेणीतील मोबाइल फोनसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या लहान बहिणीसाठी मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम पाठवली आहे, म्हणून अतिरिक्त कस्टम ड्युटी, भारतीय कर, चलन रूपांतरण शुल्कासाठी आणखी पैसे लागणार असे सांगून पुरुषाने महिलेकडून ७ लाख ९८ हजार रुपये उकळले. मात्र, एवढे पैसे भरूनसुद्धा अधिक पैशांची मागणी केल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनतर तत्काळ सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेत महिलेने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता कलमांतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारी, विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मॅट्रिमोनिअल फ्रॉड म्हणजे काय ?
वैवाहिक साइटवर एक प्रभावी ऑनलाइन प्रोफाइल तयार करून, संभाव्य वर असल्याचे भासवले जाते. त्यांनतर फसवणूक करणाऱ्या महिलांशी मैत्री करतात. त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. वधूचे पालक म्हणून बोलण्यासाठी आवाज बदलणाऱ्या ॲप्सचा वापर केला जातो. एकदा महिलांचा विश्वास बसला की, आणीबाणीची परिस्थिती असल्याचे भासवून महिलांकडून पैसे मागतात. पैसे मिळाल्यावर अदृश्य होतात आणि चक्र पुढे सुरू राहते.
सायबर क्राइम सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 'ॲडव्हान्स फी स्कॅम'ची आहे. अशा प्रकरणांमध्ये, पीडितांना करार, मौल्यवान वस्तू, भेटवस्तू, यासह जादा नफ्याचे आमिष दाखवून क्लिअरन्स शुल्क, प्रक्रिया शुल्क अशा वेगववेगळ्या बहाण्याने रक्कम मागितली जाते. अशा फसवणुकीला बळी पडल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर क्राइम सेलशी संपर्क साधावा.