तब्बल साडेसोळा हजार पुणेकरांना कुत्र्यांचा चावा; शहरात जवळपास साडेतीन लाख भटकी कुत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:25 PM2023-03-15T15:25:46+5:302023-03-15T16:13:03+5:30
भटक्या कुत्र्यांच्या भीतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात
संतोष गाजरे
कात्रज : पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या जवळपास साडेतीन लाख आहे. गेल्या वर्षभरात महापालिका हद्दीतीत तब्बल १६ हजार ५६९ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद दवाखान्यांमध्ये आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. दरम्यान, पुणे शहरात २० हजार ९५६ (डिसेंबरपर्यंत) कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी खराडीत मुलगा खेळत असताना त्याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांनी अधिवेशनात पुणे महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर कात्रजमधील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, भारती विद्यापीठ, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुखसागर नगर, कात्रज-कोंढवा रोड व आजूबाजूच्या परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा धुडगूस वाढला आहे. ज्येष्ठ महिला, नागरिक घराबाहेर पडल्यानंतर भटके कुत्रे मागे लागत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी नागरिकांच्या दुचाकीच्या मागे भटके कुत्रे धावतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी वाहने चालवावी लागत असल्याचे नागरिक सांगतात.
शहरातील नागरिकांना या सार्वजनिक प्रश्नाने भेडसावले आहे. याकडे मनपाने गांभीर्याने पाहून यावर पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारांवर हल्ले करत असल्याने दहशतीचे वातावरण आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर १५ ते २० कुत्र्यांचा टोळका
रात्रीच्या वेळी आम्ही कामावरून येताना आंबेगाव बु. स्मशानभूमी ते दळवीनगर या रस्त्यावर १५ ते २० कुत्र्यांचा टोळका असतो. तो अंगावर येतो. रात्रीच्या वेळी हॉटेल व्यावसायिक, चिकन दुकानदार उरलेले अन्नपदार्थ रस्त्यावर टाकतात. त्यामुळे कुत्रे त्यावर तुटून पडतात. तसेच जवळून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवतात. या विषयावर खूप वेळा पाठपुरावा घेतला; पण मनपा अधिकारीही लक्ष देत नाहीत. -बालाजी भोसले, नागरिक, आंबेगाव बु.