Heavy Rain: गणरायाला निरोप देताच पावसाचा धुमाकूळ; पुण्यात मुसळधार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 05:31 PM2022-09-11T17:31:26+5:302022-09-11T17:31:39+5:30
अचानक सुरु झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची तारांबळ उडाली
पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्यादिवशी अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे गणरायाला उत्साहात निरोप देता आला. पण विसर्जनानंतर दोन दिवसांनी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरासहित उपनगरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान मागील दोन दिवस उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु पाऊस पडला नाही. आज सकाळापासून आभाळ वातावरण दिसू लागले होते. दुपारनंतर ढगांमुळे सर्वत्र काळोख पसरला होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान गणेशोत्सवात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी दहा दिवसात संततधार पाऊस सुर होता. मात्र विसर्जन आणि त्यानंतरचा दुसरा दिवस पावसाने ब्रेक घेतला. आजपासून पुन्हा पावसाची धामधूम सुरू झाली आहे.
मध्यवर्ती भाग आणि उपनगरात पाण्याचे लोंढे
पुण्यात ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासहित पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. बऱ्याच ठिकाणी वाहतूककोंडीही झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले.