Pune Crime: लायसन्सबाबत विचारणा करताच मुलाने आई, बहिणीच्या पोटात खुपसला चाकू
By नितीश गोवंडे | Published: September 25, 2023 05:59 PM2023-09-25T17:59:37+5:302023-09-25T18:07:49+5:30
पुणे : बेरोजगार मुलाला त्याच्या आईने ड्रायव्हिंग लायसन्स बाबत विचारणा करताच त्याने आई आणि बहिणीच्या पोटात चाकू खूपसत त्यांना ...
पुणे : बेरोजगार मुलाला त्याच्या आईने ड्रायव्हिंग लायसन्स बाबत विचारणा करताच त्याने आई आणि बहिणीच्या पोटात चाकू खूपसत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काळेपडळ येथील बिनावत टाऊनशिप सोसायटीत शनिवार (२३ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडला. याप्रकरणी रुबीना युसुफ पठाण (३०, रा. बिनावत टाऊनशिप सोसायटी, काळेपडळ रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी साजिद युसुफ पठाण (२९) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद हा कोणताच कामधंदा करत नाही. त्यामुळे घरात नेहमी किरकोळ वाद होत होता. शनिवारी संध्याकाळी आरोपी साजिद याच्या आईने त्याला लायसन्सविषयी विचारणा केली. याचा राग येऊन साजिदने ‘तेरे को तो मै आज मार दुँगा’ असे म्हणत आधी बहिण रुबीना यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आरोपी साजिदची आईमध्ये पडली असता त्याने आईवर देखील चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सध्या फिर्यादी रुबीना आणि त्यांच्या आईवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अब्दागिरे करत आहेत.