पट्टी टाकताच लागते पेट्रोलची धार; चोरटयांनी लढवली अनोखी शक्कल, पुण्यातील खळबळजनक प्रकार
By विवेक भुसे | Published: April 9, 2023 03:44 PM2023-04-09T15:44:30+5:302023-04-09T15:45:29+5:30
टँकरमधून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल २ कोटींचा माल जप्त, चौघांना अटक
पुणे : विमानासाठी लागणारे शुद्ध पेट्रोल घेऊन जाणारे टँकर आडबाजूला उभे करतात. वॉल बॉक्समध्ये असलेल्या फटीचा गैरफायदा घेऊन त्यात पट्टी टाकतात. त्याबरोबर खालच्या बाजूला पेट्रोलची धार लागते. हे पेट्रोल ट्रेमध्ये गोळा करुन कॅनमध्ये भरले जाते. त्यानंतर ते काळ्या बाजारात विकले जाते. टँकरमधील पेट्रोल चोरीचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला. टँकरमधील काढलेले १४ प्लॅटिक कॅन पेट्रोलसह २ कोटी २८ लाखांचा माल जप्त केला असून चौघांना अटक केली आहे.
सुनिल कुमार प्राणनाथ यादव (वय २४), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय३७), सचिन रामदास तांबे (वय ४०), शास्त्री कबलु, सरोज (वय ४८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनिल रामदास तांबे (वय ३८, रा. हडपसर) याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याच्या सांगण्यावरुन चोरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील वाशी येथून शिर्डी येथील विमानतळावर विमानांसाठी पेट्रोल घेऊन टँकर निघाले होते. हे टँकर कंपनीकडून मार्ग निश्चित केला असतानाही हडपसरजवळील १५ नंबरमधील लक्ष्मी कॉलनीत थांबले असून त्यातून पेट्रोल काढले जात असल्याची माहिती पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकला. तेथे दोन टँकरमधून पेट्रोल काढले जात होते. तेथे एकूण ८ टॅकर उभे होते. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परिमंडळ विभागाचे अधिकारी यांना समक्ष बोलावून घेतले.
या ठिकाणाहून पोलिसांनी २९ हजार ५४० रुपयांचे प्लॅस्टिक कॅनमध्ये गोळा केलेले पेट्रोल, ८ पेट्रोल टँकर, इलेक्ट्रिक मोटार पंप असा २ कोटी २८ लाख ५ हजार १९५ रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीखक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, रशिद शेख, शाहीर शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, कुंडलिक केसकर यांनी केली.