वाहन काढा म्हणताच पोलिसाला तृतीयपंथीयाकडून धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:34 AM2024-01-16T11:34:01+5:302024-01-16T11:36:02+5:30
प्रकरणी तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे :कोरेगाव पार्क भागात तृतीयपंथीयाने पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई तुळशीराम सावंत यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक ६ मधील दुर्गा कॅफेसमोर वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने मोटार लावण्यात आली होती. पोलिस शिपाई सावंत यांनी तृतीयपंथीय मोटारचालकाला ती बाजूला घेण्यास सांगितली. त्यानंतर तृतीयपंथीयाने रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
सावंत यांना धक्काबुक्की केली. सावंत यांनी या प्रकाराचे मोबाइलवर चित्रीकरण केले. तेव्हा तृतीयपंथीयाने मोबाइल हिसकावून घेतला. सावंत यांचा मोबाइल रस्त्यात फेकून दिला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.