Pune Metro: पंतप्रधानांना घेऊन जाण्याचं टेन्शन होतंच पण..., मेट्रो चालकांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:22 PM2022-03-06T21:22:14+5:302022-03-06T21:22:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सकाळी पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन करण्यात आले
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सकाळी पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन करण्यात आले. मोदींनी गरवारे ते आनंदनगर मेट्रोने प्रवासही केला. यावेळी मेट्रो चालकांनी स्वत:चाच अभिमान वाटतो आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवणाऱ्या गाडीचे चालक जी, सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानपद म्हणजे देशातील मानाचे पद, त्यांना मेट्रोमधून घेऊन जाणे हे जबाबदारीचेच काम होते. त्याचा ताण तर होताच, पण आता सवारी पूर्ण केल्यावर स्वत:चाच अभिमान वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
जी. सचिन यांच्याबरोबर अमेय केसरकर हे सहचालक म्हणून मेट्रोच्या चालक केबीनमध्ये उपस्थित होते. सचिन यांना मेट्रो चालवण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. ते म्हणाले, अनुभव असला तरीही पंतप्रधान व त्यांच्याबरोबर केंद्राचे, राज्याचे मंत्री असणार याचा ताण आला होता. थोडीशीसुद्धा चूक महागात पडली असती. त्यासाठीच या गाडीवर मागील चार दिवस सराव केला होता. सुदैवाने काही झाले नाही. आता स्वत:चाच अभिमान वाटतो आहे असे सचिन यांनी सांगितले.
तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव
२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी आले होते. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी तरी प्रत्येक फ्लॅटफॉर्मवर स्वच्छता पाहायला मिळाली. हीच स्वच्छता कायस्वरूपी राहावी अशी चर्चाही पुणेकरांमध्ये सुरु होती.