मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस; पती, सासू-सासरे, आई-वडिलांवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: May 9, 2024 05:37 PM2024-05-09T17:37:31+5:302024-05-09T17:38:09+5:30
मुलगी माध्यमिक शिक्षण घेत होती. मात्र, लग्न लागल्यामुळे तिचे शिक्षण अपूर्ण राहिले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर
पिंपरी : अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लातूर येथे १४ जुलै २०२३ ते ७ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित १७ वर्षीय मुलीने याप्रकरणी बुधवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरे, मुलीची आई आणि वडील या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील संशयितांनी तिचा विवाह २३ वर्षीय तरुणासोबत लावला. लग्नानंतर पतीने अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डाॅक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
शिक्षण अपूर्ण...
अल्पवयीन मुलीचे आईवडील मिळेल ते काम करतात. मजुरी करत असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मुलगी माध्यमिक शिक्षण घेत होती. मात्र, लग्न लागल्यामुळे तिचे शिक्षण अपूर्ण राहिले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.