Pune | आर्द्रता घटल्याने पुन्हा वाढणार हुडहुडी; किमान तापमानात ४ अंशांची घट होण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:48 AM2023-02-01T08:48:54+5:302023-02-01T08:49:48+5:30
आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने धुके...
पुणे : शहरात गेल्या चार दिवसांपासून पहाटे वाढलेल्या आर्द्रतेमुळे रात्री उशिरा आणि पहाटे धुके वाढले होते. मात्र, बुधवारपासून आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे किमान तापमानात घट होणार असून, थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ३ ते ४ अंशांनी पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी (दि. ३१) सकाळी शिवाजीनगरमध्ये सापेक्ष आर्द्रता ९६ टक्के, पाषाणमध्ये ९२, लोहगाव व मगरपट्ट्यात ७७, तर चिंचवडमध्ये ६७ टक्के इतकी होती. लवळेमध्ये हेच प्रमाण ७६ टक्के होते. शहरात यापूर्वी २५ जानेवारीला या भागांतील सापेक्ष आर्द्रता ५७ ते ८७ टक्के इतकीच होती.
हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, उच्च आर्द्रता पातळी आणि तुलनेने किमान तापमानातील घट यामुळे शहारात रात्री उशिरा व पहाटे धुके पसरते. सध्या सापेक्ष आर्द्रता जास्त असल्याचा हा परिणाम आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळपासून आर्द्रता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी यात आणखी घट आली. बुधवारपासून ती आणखी कमी होईल, ज्यामुळे येत्या काही दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होईल तसेच आकाशाही निरभ्र राहील, असा अंदाज असल्याने शहरात धुके कमी होणार आहे.
आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने धुके
उत्तर भारतावरील पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. उत्तरेकडील थंड वारे तसेच दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये आंतरक्रिया होत असून, हे वारे तुलनेने उबदार, ओलसर आहेत. आर्द्रतेचे प्रमाण वाढून धुके वाढले आहे. आर्द्रता कमी होण्याचा अंदाज असल्याने उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये त्यात पुणे शहर आणि जिल्ह्याचा समावेश आहे. जोरदार उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह जाणवू शकतो, ज्यामुळे येत्या काळात रात्रीच्या तापमानात सुमारे ३ ते ४ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरात २ ते ३ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल आणि त्यामुळे येत्या काही दिवसांत सापेक्ष आर्द्रता आणखी कमी होईल, असेही या अंदाजात म्हटले आहे.