Pune Rain: नेहमीप्रमाणे शहरात संततधार पाऊस सुरु; पुणेकर चांगलेच आनंदी
By श्रीकिशन काळे | Published: July 22, 2024 02:55 PM2024-07-22T14:55:20+5:302024-07-22T14:56:20+5:30
संततधार पावसाने पुण्यातील धरणसाठ्यातही वाढ होत आहे
पुणे: कित्येक वर्षानंतर रविवारपासून वरूणराजाने पुण्यात पुन्हा रिपरिप सुरू केली आहे. रविवारपासून पावसाची संततधार सुरू असून, आज सोमवारी सकाळी देखील ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’ असेच म्हणावे लागत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच आनंदी झाले आहेत. पुर्वीचा संततधार पाऊस परतल्याने आज पुणेकर खुशीत आहेत. (Pune Rain)
मॉन्सून (Monsoon) सुरू झाल्यापासून पावसाने पुणे शहरात ओढ दिली होती. संपूर्ण जून महिन्यात वरूणराजाचे चांगले दर्शन झाले नाही. पण जुलै महिना सुरू झाल्यापासून हळूहळू पावसाने बरसायला सुरवात केली आणि रविवारपासून तर पूर्वीसारखा रिपरिप पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणसाठ्यातही वाढ होत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत ६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १४ जुलै रोजी सर्वाधिक ३४ मिमी पाऊस झाला असून, २२ जुलै रोजी ४.८ मिमी पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून गेले आणि संततधार सुरू झाला. रात्रभर देखील तो बरसत होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने पावसाळ्याचा अनुभव पुणेकर आज घेत आहेत.
घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस पडत असून, दिवसभरात शंभर मिमीहून अधिक पावसाची नोंद तिथे होत आहे. ताम्हिणीमध्ये रविवारी २३० मिमी पाऊस झाला आहे. तर लोणावळा १४२ मिमी, शिरगाव १६८ मिमी, अंबोणे १९० मिमी, डुंगुरूवाडी १४८ मिमी, कोयना १२७ मिमी, खोपोलीत १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
शिवाजीनगर : ४.६
लोणावळा : १४२
तळेगाव : १९.५ मिमी
खेड : १२ मिमी
दापोडी : ११.५ मिमी
चिंचवड : ८ मिमी
पाषाण : ६.३ मिमी
राजगुरूनगर : ५.५ मिमी
कोरेगाव पार्क : ४.५ मिमी
नारायणगाव : ४ मिमी
हडपसर : १.५ मिमी
बारामती : १०.८ मिमी
दौंड : ०.८ मिमी