तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 04:44 PM2022-09-15T16:44:04+5:302022-09-15T17:04:57+5:30
मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत
पिंपरी-चिंचवड : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील वेदांत फोक्सकॉन ही कंपनी गुजरातला नेली आहे. त्यामुळे मावळातील सुमारे दीड लाखो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. भाजपने हा प्रकल्प गुजरातला पळविल्याने मावळातील कामगार चळवळीतील नेत्यांनी आणि राजकीय नेत्यांनी टीका केली आहे. ‘प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी एकजूट करू, अशी भूमिका भाजपाने तर ‘‘गुजरातमध्ये कंपनी जाण्यामागे गुजरातधार्जिण्या शिंदे-फडणवीस सरकाचाच हात आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात तीन टप्प्यांत गुंतवणूक करण्याचे धोरण होते. त्यातून १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि २ लाख जणांना रोजगार मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी संलग्नता ठेऊन सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन उत्पादन करण्याचे धोरण ठरविले होते. त्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमी कंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्पांचे नियोजन सुरू झाले होते. त्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरातील एक आणि विदर्भातील एका जागेचा विचार सुरू केला होता.
दरम्यान, राज्यातील सरकारच्या दिरंगाई कारभाराने कंपनीचे स्थलांतर गुजरातमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गुजरात’मध्ये कंपनीचे स्वागत केल्याचे ट्वीट केल्याने मावळ परिसरात नाराजीचा सूर आहे तर मावळात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरून राजकारण सुरू झाले आहे. त्यावरून राजकीय आखाडा सुरू झाला आहे.
''राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा प्रकल्प पुन्हा मावळ तालुक्यात कसा येईल, यासाठी प्रयत्न करावा. महाराष्ट्रातील तरूणांना, मावळमधील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. -बाळा भेगडे, माजी मंत्री आणि भाजपचे नेते.''
''मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत आहे. केवळ राजकारणासाठी मावळातील तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करू नका. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यामागे गुजरातधार्जिण्या शिंदे-फडणवीस सरकारचाच हात आहे. - सुनील शेळके (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)''