"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:08 PM2022-04-16T12:08:53+5:302022-04-16T12:13:59+5:30
"...अन् जातीय तणाव निर्माण केला जाईल"
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jaynat patil) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील दुधाने लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी जयंत पाटील यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या हिंदुत्वाचा मुद्द्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. एकीकडे राज ठाकरे हिंदुत्वाचा आग्रह धरणार तर दुसरीकडून असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) पिक्चरमध्ये येतील. आणि अशाप्रकारे जातीय तणाव निर्माण केला जाईल, असं जयंत पाटील म्हणाले
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आले आहे तर दुसरीकडे इफ्तार पार्टी देखील ठेवण्यात आली आहे. याविषयी विचारले असता जयंत पाटील म्हणाले, याला सर्वधर्मसमभाव म्हणतात. सर्व धर्मांचा सन्मान राखणे आणि सर्वच धर्मियाना समान वागवणे याची ही पद्धत आहे. मात्र मनसेकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे राज ठाकरे हिंदुत्वाचा आग्रह करतात तर काही दिवसांनी यामध्ये ओवेसींची इंट्री होईल. त्यातून जातीय तणाव निर्माण करून काहीतरी अघटित घडवण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे.
राज्यात सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस, सिमेंट यांच्या महागाईची चर्चा होत नाही. मात्र हनुमान चालीसाची चर्चा आवर्जून होते. आम्ही हनुमानाचे आणि रामाचे भक्त आहोत मात्र त्याचं कधीही प्रदर्शन करत नाही. राजकारण करण्यासाठी देवाचा वापर करणं हे आम्ही कधी केलं नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती होणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येथील पुण्यातील एका हनुमान मंदिरात महाआरती संपन्न होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच पुणे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.