बारामतीत कोरोनाचा चढता आलेख; उपाय योजनांमध्ये सातत्य ठेवा : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:01+5:302021-08-22T04:13:01+5:30
पवार यांच्या सूचना कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा बारामती : बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत ...
पवार यांच्या सूचना
कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
बारामती : बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच, कोणीही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच, बारामती तालुक्यात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्य:स्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अँटिजेन तपासणी, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवड्यापेक्षा कोरोनाबाधितांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच, कोणीही हलगर्जीपणा करू नये. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून बारामती शहरात, तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जादा आहे. संसर्ग कशामुळे वाढला, याची माहिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबवा. टेस्टिंग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट ठिकाणे प्रतिबंधित करण्यात यावीत, जेणे करून कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल. कोरोना संसर्ग इतर ठिकाणी कमी होत आहे. बारामतीमध्ये का कमी होत नाही, त्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना राबवा असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील रिंगरोडची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.