राख विविध कार्यकारी सोसायटीची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:12+5:302021-02-18T04:19:12+5:30
-- नीरा : राख (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीच्या मागणीसाठी राख येथील ...
--
नीरा :
राख (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीच्या मागणीसाठी राख येथील सोसायटीच्या सभासदांनी बुधवारी मोर्चा काढून नीरा येथील जिल्हा बँकेच्या समोर काही काळ ठिय्या आंदोलन केले.
राख येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव अनागोंदी कारभार करत आहेत. सोसायटीच्या सभासदांची सभासद फिचा अपहार केल्याच व कर्जमाफीत ही अफरातफर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोसायटी याबाबतची माहिती देत नाही, असेही त्यात म्हटले आहे.
नीरा येथे बुधवारी फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता या सभासदांनी बुवासाहेब चौक ते पुणे जिल्हा बँके दरम्यान मोर्चा काढला. यानंतर बँकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये चंद्रकांत रणनवरे, गजानन रणनवरे, सूर्यकांत रणनवरे, तानाजी रणनवरे, शिवाजी माने, सोमनाथ सुर्वे, गोरख पवार, मधूकर पवार, भरत रणनवरे इत्यादींनी सहभाग घेतला.
यावेळी सोसायटीने कर्जमाफीत मर्जीतील लोकांना कर्ज माफीत बसवले. तर विरोधक सभासदांना कर्जमाफीत बसत असूनही कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोसायटीच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराची चौकशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. या सभासदांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी याबाबतचे एक निवेदन आंदोलनस्थळी दिले आहे.
--
चौकट
"ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने त्यांचा तोल ढासळत आहे. राख सोसायटीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कोणतीही अनियमतता झाली नसल्याचे सोमवारी पुरंदरच्या सहायक निबंधक यांनी सांगतले आहे. शेअर्स सर्टिफिकेट सभासदांना दिले असून, तक्रारदार सतत माहिती अधिकाराचा वापर करत नाहक त्रास देत असतात. ग्रामपंचायतीच्या पराभवामुळे तक्रारदार खोडसाळपणे नाहक बदनाम करण्याच्या हेतूने बिनबुडाचे आरोप करत आहेत."
- महेंद्र माने,
चेअरमन राख विविध कार्यकारी सोसायटी.