Pune University: आशा भोसले, नवाजुद्दीन सिद्दिकी देणार संगीत - अभिनयाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 10:47 AM2021-12-09T10:47:42+5:302021-12-09T10:47:50+5:30
पुणे विद्यापीठ व सेलिब्रिटी स्कूल यांच्यात यासंदर्भातला शैक्षणिक करार नुकताच झाला असून आशा भोसले, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, दिग्दर्शक मधुर भांडारकर, शेफ विकास खन्ना, मेकअप आर्टिस्ट ओजस रजनी, उद्योजक सिद्धार्थ प्रभाकर यासारख्या तज्ज्ञांकडून ऑनलाइन धडे गिरवण्याची संधी उपलब्ध झाली
राहुल शिंदे
पुणे : संगीत, अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, मॉर्डन कुकिंग, फोटोग्राफी, बिझनेस आदी क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडून प्रत्यक्षात शिक्षण घेण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुणे विद्यापीठ व सेलिब्रिटी स्कूल यांच्यात यासंदर्भातला शैक्षणिक करार नुकताच झाला आहे. त्यामुळे आशा भोसले, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, दिग्दर्शक मधुर भांडारकर, शेफ विकास खन्ना, मेकअप आर्टिस्ट ओजस रजनी, उद्योजक सिद्धार्थ प्रभाकर यासारख्या तज्ज्ञांकडून केवळ ७२० रुपयांमध्ये ऑनलाइन धडे गिरवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘डिग्री प्लस’च्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांना विविध पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘डिग्री प्लस’ची स्वतंत्र लिंक सुरू करण्यात आली आहे. यात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सेलिब्रिटी स्कूलअंतर्गत गणेश आचार्य यांच्याकडून नृत्य, डब्बू रतनानी, सबिरा मर्चंट यांच्याकडून संवाद कौशल्य, मान्या सिंग हिच्याकडून कॉन्फिडन्स बिल्डिंग, हुसेन झैदी यांच्याकडून लेखन, गायक शान याच्याकडून संगीत शिकण्याची संधी मिळणार आहे. ‘डिग्री प्लस’च्याअंतर्गत ईडब्ल्यूएस ॲकॅडमी, सिंप्लिलर्न, ई-किडा आणि सेलिब्रिटी स्कूल यांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील काही अभ्यासक्रम पूर्ण मोफत असून काही अभ्यासक्रमांना अत्यल्प शुल्क आकारले जात आहे. कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे पदवीनंतर तत्काळ रोजगार मिळवणे शक्य होणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून परीक्षा दिल्यानंतर नामांकित विद्यापीठांचे प्रमाणपत्र मिळणार
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर degreeplus.in हे स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनाही काही अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून परीक्षा दिल्यानंतर नामांकित विद्यापीठांचे प्रमाणपत्र मिळणार आहे. अनेक व्हिडीओ डाऊनलोड करून ठेवण्याची तसेच स्वत:च्या वेळेनुसार ते पाहून परीक्षा देण्याची सोय विद्यार्थ्यांना असेल.