Ashadhi Ekadashi: ढोल-ताशांचा निनादात विठूनामाचा गजर; प्रतिपंढरपूर दौंडमध्ये अवघी दुमदुमली पंढरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 07:20 PM2022-07-10T19:20:57+5:302022-07-10T19:21:20+5:30
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंडला आषाढी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
दौंड : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंडला आषाढी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी पंचक्रोशीतील १४ गावांतील ग्रामदैवतांच्या पालख्यांचे आगमन झाल्याने अवघा परिसर भक्तिमय झाला होता. टाळ-मृदंग, ढोल-ताशांसह विठूनामाचा गजर, विठ्ठलाच्या ध्वनिफिती, भगवे ध्वज आणि वारकऱ्यांच्या विठूभेटीचा उत्साहामुळे अवघी दौंडनगरी दुमदुमली होती.
हजारो भाविकांनी भीमा नदीत स्नान करून राही रुक्मिणीसह विठ्ठलाचे दर्शन घेतले. डॉ. हेडगेवार स्मृती समितीच्या शालेय दिंडी स्पर्धेमुळे हजारो शालेय बालचमूंनी शालेय दिंड्या काढल्याने विठ्ठल - रखुमाई, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी अवतरले होते. येथील पुरातनकालीन विठ्ठल मंदिरात पहाटे ॲड. सचिन नगरकर, शिल्पा नगरकर यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी पौराेहित्य अतुल गटणे परिवाराने केले होते. मंदिराला विद्युत रोशणाई करून तोरण पताका लावल्या होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे डॉ. हेडगेडवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिणोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी शहरातून हजारो विद्यार्थ्यांच्या वाजत-गाजत शालेय दिंड्या निघाल्या. त्यानंतर दुपारी ११ वाजेच्या सुमारास पंचक्रोशीतील चौदा ग्रामदैवतांच्या पालख्यांचे आगमन झाले. प्रथेनुसार गावचे पाटील वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे, मल्हार जगदाळे यांनी पालख्यांचे पूजन करून स्वागत केले.