आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 11:11 AM2024-06-30T11:11:49+5:302024-06-30T11:13:10+5:30
जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !!
लोकमत न्यूज नेटवर्क, आळंदी: श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यास शनिवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष नयनांनी हा सोहळा अनुभवला. सायंकाळी सातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. प्रस्थान सोहळ्यात पहाटे पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुग्धारती झाली. दुपारी महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. दोन वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे सायंकाळी साडेसहा वाजता ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर वीणा मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आले.
तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले. पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. यावेळी एकच जयघोष करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. त्यांनी एकत्रित फुगडीही खेळली. विशेष म्हणजे प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्याला दाखल झाले.