यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:29 AM2022-05-24T08:29:41+5:302022-05-24T08:31:45+5:30

वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहेत...

ashadhi vaari 2022 will be held in the record presence of Warakaris pandharpur | यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

googlenewsNext

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून आषाढी पायी वारी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांसमवेत लालपरीतून प्रवास करून पंढरीत साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम, अटी व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहे.

यंदा आषाढी वारी सोहळा हा वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत साजरा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे, नदी आणि इतर परंपरागत ठिकाणांची पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी पाहणी केली.

दरम्यान मुक्काम तळ, रिंगणाच्या जागेवर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्त्याच्या कामामुळे शेकडो झाडे कापली गेल्याने वारकऱ्यांना दुपारी भोजनाच्या वेळी सावलीसाठी ग्रीन नेट बांधण्याची विनंती केली आहे. याशिवाय यंदा माउलींच्या पालखीसोबत पाच ते सहा लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार असल्याने पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्य व्यवस्था करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

यंदा जेजुरीचा पालखी तळ बदलला...

जेजुरीत नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर होत असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीची जागाही रस्त्याच्या कामात गेल्याने या जागेबाबत पर्यायांची माहिती घेतली. एकंदर पालखी मार्गावर यंदा वारकऱ्यांसाठी चार पदरी रस्ता बनल्याने भाविकांची चांगली सोय झाली असून मार्गात येणाऱ्या किरकोळ अडचणी प्रशासनाला सांगण्यात आल्याचे ढगे यांनी सांगितले.

आळंदीतून पालखी प्रस्थान : २१ जून

Web Title: ashadhi vaari 2022 will be held in the record presence of Warakaris pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.