Ashadhi Wari | शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:24 PM2022-06-25T14:24:03+5:302022-06-25T14:25:16+5:30
यंदा वारीसाठी परवानगी दिल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह...
पाटेठाण (पुणे) : राहू (ता.दौंड) येथील शंभो महादेव पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकाराम हरीनामाचा गजर करत मोठ्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. राहू गावचे ग्रामदैवत शंभो महादेव पालखी सोहळ्याचे यंदा अकरावे वर्ष आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा बंद असल्याने अनेक वारक-यांचा हिरमोड झाला होता. यंदा वारीसाठी परवानगी दिल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
अभिषेक, विधीवत पुजा, विणा आणि पादुका पुजन केल्यानंतर टाळ, मृदगांच्या गजरात सवाद्य भव्य आकर्षक स्वरुपात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी घरासमोर सडा, रांगोळीच्या पायघड्या घालत स्वागत करण्यात आले. आषाढी महावारीसाठी मानाची बैलजोडी टेळेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन आबासो थोरात यांची असून मानाचा अश्व बापुसो धनाजी सोनवणे यांचा आहे.
पालखी सोहळा पिंपळगाव, खुटबाव, भांड़गाव, मुर्टी, मोरगाव, वाकी, होळ, फलटण, बरड़, नातेपूते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आदी गावांंमध्ये चौदा मुक्काम करीत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. यावेळी माजी आमदार रंजना कुल, सरपंच दिलिप देशमुख, माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजप नेत्या कांचन कुल, कैलास गाढवे, बंडोपंत नवले, किसन शिंदे, मारुती मगर, कांतीलाल काळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.