Ashadhi Wari 2022| वारीच्या वाटेवर: आळंदीतील माऊलींनी चालवलेली निर्जीव भिंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:42 PM2022-06-18T14:42:53+5:302022-06-18T15:07:58+5:30
- भानुदास पऱ्हाड आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत वडगाव चौकालगत प्रदक्षिणा रस्त्यावर माऊलींनी चालवलेल्या भिंतीचे आकर्षक मंदिर आहे. राज्यभरातून माऊलींच्या ...
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत वडगाव चौकालगत प्रदक्षिणा रस्त्यावर माऊलींनी चालवलेल्या भिंतीचे आकर्षक मंदिर आहे. राज्यभरातून माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत आलेले वारकरी तथा भाविक या भिंतीचे मनोभावे दर्शन घेतात.
तव कव्ययज्ञ गृहस्थाचे घरी ।
पितर मंत्रोच्चारी आव्हानिले।।
पशुमुखे वेद दृष्यलोक ।
थोर हे कवतुक दाखविले ॥
त्यांचे पितृगण आणियले !
नेवासा येथे संत भावंडांनी तिरडीवरून सच्चिदानंद बाबांना उठविले व त्याठिकाणी श्री गीतेवर माऊली ज्ञानदेवांनी श्रीगुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने सच्चिदानंद बाबा करवी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. संत श्री निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान देव, मुक्ताबाई हे सच्चिदानंद बाबासह पुन्हा आळंदीतील सिद्धबेटात वास्तव्यास परत आले. ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क चौदाशे वर्षांचे होते. लहानपणापासून तप साधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती, सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं. त्यांना कुठल्याही सजीवावर नियंत्रण मिळविता येत असे.
सामान्य माणसे घोड्यावर, हत्तीवर फिरतात. पण हे चांगदेव वाघावर फिरायचे. वाघ सिंहासारखे हिंस्त्र प्राणी वाहन म्हणून वापरत होते. वाघावर चाबूक म्हणून ते साप वापरायचे. आपल्या योग शक्तीने त्यांनी हे शक्य केले होते. इतकी वर्षे योगसाधना करून आणि सिद्धी प्राप्त करूनसुद्धा ते समाधानी नव्हते. त्यांना आपल्याला अजूनही परब्रह्म म्हणजे देव कळला नाही, असे वाटे. जेव्हा त्यांच्या कानी ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली. कोण असेल हा इतका तरुण योगी? एवढ्या कमी वयात याने गीतेवर भाष्य लिहिलं, लोकांना अध्यात्म शिकवतो. म्हणून ते माऊलींच्या भेटीसाठी आपला शिष्यांचा ताफा घेऊन ते आळंदीकडे निघाले. सापाचा चाबूक घेऊन वाघावर बसलेले चांगदेव आणि त्यांचे भरपूर शिष्य, असा लवाजमा आळंदीजवळ पोहोचला.
ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचून त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झालेला असला तरी त्यांनीही आपण किती पोहोचलेले योगी आहोत हे बघावे, अशी एक सुप्त इच्छा चांगदेवांच्या मनात होती. त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचली. आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या स्वागताला समोर जायचं ठरवलं. तेव्हा ते एका भिंतीवर आपल्या भाऊ-बहिणीशी गप्पा मारत बसले होते. माऊलींनी श्रीगुरू निवृत्तीनाथांच्या आदेशाने निर्जीव भिंतीला चालवत नेले व श्री चांगदेवांना सामोरे गेले. त्यावेळी श्री चांगदेवांना त्याची महती समजली. श्री चांगदेव त्यांना शरण आले.
उपजताच ज्ञानी ऐसे वर्म जाणूनी ।
लोटांगणी आले चांगदेव ।
श्री चांगदेवांना चांगदेव पासष्टी न संत ज्ञानेश्वरांनी उपदेश केला तर श्री ज्ञानदेवांचे आदेशाने संत मुक्ताई यांनी श्री चांगदेवांना बोध करवून शिष्य बनविले. माऊलींनी चालविलेल्या निर्जीव भिंतीच्या दर्शनासाठी वारकरी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.