Ashadhi Wari 2022| वारीच्या वाटेवर: ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेश केलेले स्थळ विश्रांतवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:08 PM2022-06-16T12:08:55+5:302022-06-16T12:10:46+5:30
श्री ज्ञानदेव आणि चांगदेवांची या परिसरात भेट...
-भानुदास पऱ्हाड
आळंदी : १२ व्या १३ व्या शतकात श्री ज्ञानदेव आणि चांगदेवांची या परिसरात भेट झाली; ते हे ठिकाण असून ज्ञानेश्वरांनी येथे चांगदेवांना उपदेश केल्याने या ऐतिहासिक स्थळाला फार महत्त्व आहे. चांगदेव एक योगी पुरुष होते. जन्मत:च त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. चौदा विद्या अवगत करून त्यांनी मृत्यूला जिंकले होते. मृत्यूची वेळ जवळ आली की, ते प्राण आत्मस्थानी आणि आत्मा ब्रह्मांडी ठेवत असत. वेळ निघून गेली की, ते पुनरूपी देहात येत असत. याप्रमाणे त्यांना चौदाशे वर्षे आयुष्य मिळाले. इच्छेला येईल तेथे ते जात होते. पंढरपूरला ते नित्याने जात. मात्र त्यांनी गुरू कधी केला नाही. परंतु आपल्या सिद्धीच्या जोरावर अनेक शिष्य त्यांनी केले.
महाविष्णूचा अवतार श्री ज्ञानदेव महाराज आळंदीला आहेत हे त्यांना समजल्यावर माऊलींना भेटण्याची त्यांची इच्छा झाली. मात्र पत्र लिहिताना संभ्रमात पडल्याने कोरे पत्र त्यांनी शिष्याकरवी माऊलींना पाठविले. कोरे पत्र पाहून श्री. ज्ञानदेव चकित झाले. तर मुक्ताई म्हणाली, ‘दादा चौदाशे वर्षाचा चांगा कोरा कसा?’ ज्ञानदेवांनी चांगदेवांना पत्राद्वारे पासष्ट ओव्यांतून गुरुतत्त्व सांगितले. चांगदेवांना सिद्धीचा अभिमान असल्याने ते आकाशमार्गे वाघावर बसून हातात सर्प घेऊन आपल्या चौदाशे शिष्यांसह आळंदीकडे आले.
माऊली आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या भेटीला आले. माऊलींना भावंडांसह भिंतीवर आलेले पाहून चांगदेवांच्या मनात विचार आला, सजीव वाघाला आपण वश करू शकतो. परंतु निर्जीव भिंतीला नाही. त्यानंतर चांगदेव विनम्रपणे वाघावरून खाली उतरले आणि चारही भावंडाना सामोरे आले. एका वटवृक्षाखाली चांगदेव आणि माऊलींची भेट झाली. नंतर माऊलींनी त्यांना उपदेश केला. सर्वांनी तेथे विश्रांती केली. म्हणून आळंदीतील या स्थळाला ‘विश्रांतवड’ संबोधले जाऊ लागले.
आजही असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर क्षणभर विश्रांती घेत असतात. या स्थळाचा विकास करण्यात आला असून विविध प्रकारची झाडे लावून परिसर हिरवागार केला आहे. तर विविध खेळणी व खुली व्यायामशाळा या ठिकाणी सुरू आहे. आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान संपूर्ण देशभरातील भाविक विश्रांतवड परिसरात येऊन दर्शन घेत आहेत.