आषाढी वारी २०२३ | श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 06:03 PM2023-04-08T18:03:47+5:302023-04-08T18:04:35+5:30
ही माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली...
देहूगाव (पुणे) : श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा १० जूनला होणार असून हा सोहळा २८ जुनला पंढरपूरला दाखल होईल. येथे १९ दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा २९ जुन २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी अजित महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. १० जूनला पालखी प्रस्थान दुपारी २ वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.
रविवार ११ जूनला पालखी सकाळी १०.३० वाजता येथील इनामदार वाड्यातून निधुन औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार १२ जुनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार १३ जुनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार १४ जुन लोणीकाळभोर, गुरूवार १५ जुनला यवत, शुक्रवार १६ जुन वरवंड, शनिवार १७ जुन उंडवडी गवळ्याची, रविवार १८ जुन बारामती, सोमवार १९ जुन सणसर, मंगळवार २० जुन आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार २१ जुन निमगाव केतकी, गुरूवार २२ जुन इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार २३ जुन सराटी, शनिवार २४ जुन रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल. रविवार २५ जुन रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार २६ जुन रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल.
मंगळवार २७ जुन रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल. बुधवार दि.२८ जुन रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार २९ जुन रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल. गुरूवार दि. २९ जुन ते सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी दुपार पर्यंत त पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. ३ जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरवात करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून १३ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल.
असा असेल परतीचा प्रवास-
सोमवार ३ जुलै थोरल्या पादुका येथे अभंग आरती होऊन वाखरी येथे मुक्कामी राहिल. मंगळवार ४ जुलै रोजी महाळुंगे, बुधवार ५ जुलै रोजी वडापूरी, गुरूवार ६ जुलै रोजी लासुर्णे, शुक्रवार ७ जुलै रोजी बऱ्हाणपूर, शनिवार ८ जुलै रोजी हिंगणीगाडा, रविवार ९ जुलै वरवंड, सोमवार १० जुलै उऱूळी कांचन, मंगळावार ११ जुलै रोजी नवी पेठ पुणे, बुधवार १२ जुलैला पिंपरी गाव, गुरूवार १३ जुलैला देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात पालखी विसावेल.
पालखी सोहळा प्रमुख म्हणून भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांची आज निवड करण्यात आली. यंदा प्रथमच व येथून पुढे कायम इंदापूर येथील शाळेतील मुक्कामाच्या ठिकाणात बदल करून हा मुक्काम आयटीआय महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्याच प्रमाणे उरुळी कांचन, भांडगाव, बऱ्हाणपूर येथील दुपारचे विसावे ग्रामस्थ जेथे जागा देतील तेथे रस्ताच्या कडेला राहतील अशी माहिती सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली.