Ashadhi Wari: "ऐक एक सखये बाई..." कृष्णाच्या गवळणींना दिवे घाटात धरला फेर
By नितीन चौधरी | Updated: June 14, 2023 21:01 IST2023-06-14T20:55:09+5:302023-06-14T21:01:19+5:30
वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले...

Ashadhi Wari: "ऐक एक सखये बाई..." कृष्णाच्या गवळणींना दिवे घाटात धरला फेर
पुणे : असा कसा देवाचा देव बाई लंगडा, श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा, ऐक एक सखये बाई, नवल मी सांगू काई त्रेलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई, अशा गवळणींमधून कृष्णाला आर्जव करत माऊलींच्या दिंड्यांनी चढणीला अवघड असा दिवे घाट लीलया सर केला. वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले.
पुण्यातून सहा वाजता सोहळा हडपसर कडे मार्गस्थ झाल्यानंतर सुमारे ९ च्या सुमारास पहिला विसावा हडपसरमध्ये झाला. तासाभराच्या विश्रांतीनंतर सोहळा सासवड रस्त्याने निघाला. ऊन वाढलेले असल्याने पालखी सोहळ्यात नेहमी सहभागी होणारे पुणेकर यंदा तुलनेने खूपच कमी होते. काही काळ ऊन आणि थोडा वेळ ढगाळ वातावरण असा ऊन सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वारकऱ्यांना उन्हाचा फारसा त्रास जाणवला नाही. फुरसुंगी पर केल्यानंतर पावसाची एक सर सुखद गारवा देऊन गेली. दिवे घाटाच्या पायथ्यापूर्वी उरुळी देवाची येथे सोहळा काही काळ विसावला. त्यांनतर ऊन पुन्हा वाढू लागले. घाटाला सुरूवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा विसावा घेत वारकऱ्यांनी घाट सर करण्यासाठी अंगात ऊर्जा भरून घेतली.
घाट चढण सुरु करण्यापूर्वी माऊलींच्या पालखी ला आणखी एक बैलजोडी जुमण्यात आली. रथा पुढील दिंड्या सोहळ्याचा वेग ठरवत असतात. घाटाची चढण अवघड असल्याने याच दींड्या वारकऱ्यांना कष्ट होऊ नयेत याची खबरदारी घेतात. त्यासाठीच या दींड्या कृष्णाच्या गवळीनिंचा आधार घेतात. त्यातून वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. वारकरी गवळणी गाताना फेर धरून नाचू लागले त्यामुळे ऊन चटके मारत होते तरी अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार लहरिंनी वातावरणात एक आगळावेगळा उत्साह संचारला. माऊली माऊली असा नाद हजार करत सुमारे दोन तासांनी सोहळा दिवे घाट सहज पार केला. घाट चढण पार केल्यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा हरिनामाचा गजर करत विसावा घेतला.
आळंदीहून पुण्यात येताना उशीर झाला असताना सासवडच्या वाटेवर माऊली काहीशी अर्थात तासभर लवकर पोचली होती. झेंडे वाडी येथील विसावा तासभर होता. त्यानंतर सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड येथे सव्वा नऊला पोचली.
पालखीची अडवली वाट
तुकाई दर्शन पासून फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी पालखी निम्म्याहून अधिक वाट अडवली होती. हे नागरिक रस्त्यातच उभे राहिल्याने दिंद्यांना चालणे अवघड झाले होते. अनेक नागरिक दिंडी व्यवस्थापकांनी सांगूनही बाजूला होत नव्हते. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हीच स्थिती थेट घाटाच्या पायथ्यापर्यंत होती.