Ashadhi Wari: माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:28 PM2023-06-14T20:28:42+5:302023-06-14T20:31:25+5:30
रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला...
- गणेश मुळीक
सासवड :पुणेकरांचा निरोप घेऊन माउलींची पालखी धाकटे बंधू संत सोपानदेवांच्या सासवडकडे मार्गस्थ झाली. लाखो वैष्णवांनी टाळ मृदंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट सहज पार केला. माउलींच्या पालखीचे सासवडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला.
दिवे घाट ते झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, पवारवाडी ते सासवडपर्यंत माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या दर्शनासाठी दिवे घाट परिसरात भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला. रथाला वडकी, फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या. टाळ मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.
दिवे घाट माथ्यावर विश्रांती घेऊन सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने हा मोठा प्रवास व या दिवशी एकादशी असल्याने उपवास असतो त्यामुळे वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती.
दिवे घाटमाथ्यावर झेंडेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच , ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी माउलीसह सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, माजी मंत्री दादा जाधवराव, विजय शिवतारे, कोल्हापूर परीक्षेत्र महासंचलक सुनील फुलारे, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोइटे, तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमिता पवार, नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी, झेंडेवाडी सरपंच शिवाजी खटाटे, उपसरपंच वंदना खटाटे यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांनी घाटातील वाहने पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली. त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला. पालखी सासवड मुक्कामी पोहोचल्यानंतर माउलींच्या पालखी तळावर समाज आरती झाली व सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला.