Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:31 PM2022-06-15T15:31:06+5:302022-06-15T15:31:27+5:30
वारकऱ्यांनी समूहाने एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावात थेट एसटीची सोय
पुणे : कोरोनामुळे गेली दोन वर्षे पंढरपूरची वारी झालेली नाही. यंदा आषाढीची वारी होणार असल्यामुळे पंढरपूर येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. दोन वर्षांनंतर वारी होणार असल्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार यंदा पुणे विभागातून ५३० गाड्या पंढरपूर वारीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
तसेच पुणे ते देहू ते आळंदी आणि पुणे अशा अंतर्गत वाहतुकीसाठी ६० गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर १८ जून ते १४ पौर्णिमेपर्यंत या मार्गावर फेऱ्यांची सोय केली आहे. सासवड पायी माघार येणाऱ्या भक्तांसाठीही एसटी महामंडळाच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा वारकरी संप्रदाय भक्तांचे जागोजागी स्वागत करून राहण्याची व्यवस्था केली जात आहे.
वारकरी प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा
एकाच गावातील वारकऱ्यांनी समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने गाडी सोडण्याची व्यवस्था केली आहे. ४० जणांच्या समूहाने एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. वारकरी प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
''आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची यंदा संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून ५३० गाड्या पंढरपूरसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पंढरपूरची वारी झालेली नाही. त्यामुळे वारकरी प्रवाशांची सोय होण्यासाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था केली आहे असे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.''