Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन
By प्रशांत बिडवे | Published: June 12, 2023 04:07 PM2023-06-12T16:07:13+5:302023-06-12T16:07:58+5:30
दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते...
पुणे : जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे वाकडेवाडी येथे दुपारच्या विसाव्यासाठी पावणेचार वाजता आगमन झाले. उपस्थित नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.
तुकाराम महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी विसावा मंडप उभारण्यात आला होता. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात आली होती. नागरिकांनी रांगेत दर्शन घेतले. दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते. दीड ते दोन तास विसावा घेत पालखी पुढे मार्गक्रमण करते.
यावेळी प्रांताधिकारी स्नेहलता देवकाते, पुणे शहर तहसिलदार राधिका हावळ बारटक्के, मंडळ अधिकारी सीमा गेंजगे, तलाठी गौतम डेरे, माधुरी खडसे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल रुख्मिणी भक्त मंडळाचे अध्यक्ष विरु खोमणे, सचिव राहुल भोर, सदस्य श्रीकांत पायगुडे, नितीन कुडले, अनिल माने, किशोर कारले यांच्यासह वाकडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. विसावा मंडपात गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात होती. पोलिसांकडून नागरिकांना दागिने मौल्यवान वस्तू सांभाळण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.