Ashadhi Wari: पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 08:02 PM2023-06-16T20:02:02+5:302023-06-16T20:08:47+5:30
बारामतीमधील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे...
बारामती (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी (दि १६) बारामतीत भेट देत आढावा घेतला. पालखी सोहळ्यात विशेष खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा, ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे फुलारी यांनी सांगितले.
येथील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे. येथील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, बारामती शहरचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख सुनील धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. फुलारी पुढे म्हणाले, पालखी सोहळ्यात साध्या वेषात एलसीबीचे पथक तैनात आहे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळे पथक कार्यान्वित राहणार आहे. गुन्हे घडणार नाहीत याची पूर्णतः खबरदारी घेतली जात आहे.
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व अन्य पालखी सोहळे सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. साध्या वेषातही पोलिस कार्यरत आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. विविध पथके कार्यरत आहेत. हजारोंच्या संख्येत पोलिस मनुष्यबळ उपलब्ध आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
पोलिसांना पोलिस प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दर्शनासाठी महिला व भाविकांची वेगळी रांग करण्यात आली आहे. पुणे पोलिस ग्रामीण पोलिस दलाने उत्कृष्ट नियोजन केले असून चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात असल्याचे फुलारी म्हणाले. दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात फुलारी यांनी यवत ते बारामती असा प्रवास केला. तसेच पालखी मुक्काम व सुरक्षितता याविषयीची माहिती जाणून घेतली.