Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:12 IST2024-07-04T15:11:58+5:302024-07-04T15:12:51+5:30
पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला...

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
पुणे : आज सकाळी सुमारे दहा वाजता सासवड-जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता. पुणेअग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.
पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्ताकरिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले.
पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला.