Ashadhi Wari: पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी, देहूत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी PMPML कडून जादा बस
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 27, 2024 15:53 IST2024-06-27T15:51:27+5:302024-06-27T15:53:32+5:30
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त राज्यभरातून आळंदी व देहू येथे येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी पीएमपीएमएलकडून ...

Ashadhi Wari: पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी, देहूत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी PMPML कडून जादा बस
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त राज्यभरातून आळंदी व देहू येथे येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जून २०२४ पासून ३० जून २०२४ पर्यंत आळंदीकडे जाण्यासाठी स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून १०६ बसेस संचलनात असणार आहेत.
- देहूकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून एकुण ३० बसेस महामंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. तर देहू ते आळंदीसाठी १२ बसेस देण्यात आलेल्या आहेत.
- ३० जून रोजी आळंदीमधून पालखी प्रस्थान होणार असल्याने पहाटे अडीच वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी २७ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी साडेपाच वाजेपासून संचलनात राहणार आहेत.
- पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक २ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार असल्याने महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्यात आली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
- हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी सदर मार्गांची बसवाहतुक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे चालू ठेवण्यात येणार असल्याने स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर या ठिकाणहून ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.