Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

By राजू इनामदार | Published: June 12, 2023 04:36 PM2023-06-12T16:36:48+5:302023-06-12T16:37:27+5:30

शाळा कुलुंपबंद व त्यांची किल्ली कोणाकडे तेच माहिती नाही...

Ashadhi Wari Locked school Warkari facing problem living conditions Bhawani Peth | Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

googlenewsNext

पुणे : कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकऱ्यांना आपली पथारी सोमवारी सकाळी पार्किंगच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपूरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे. शाळा कुलुंपबंद व त्यांची किल्ली कोणाकडे तेच माहिती नाही असा हा प्रकार होऊनही सायंकाळपर्यंत त्याची कोणीच दखलच घेतलेली नव्हती.

भवानी पेठ, रामोशी गेट जवळच्या सावित्रीबाई फुले प्रशालेत सोमवारी सकाळी हा प्रकार झाला. काही दिवसांपूर्वी भवानी पेठेत मोठी आग लागली होती. त्यात नेहमी वारकरी मुक्काम करत असत त्या रफी अहमद किडवाई शाळेचे बरेच नुकसान झाले. तेथील वर्गखोल्या खराब झाल्यात. याच शाळेत वारकऱ्यांना नेहमी मुक्काम होत असतो. मात्र ती खराब असल्याने सावित्रीबाई फुले प्रशालेत वारकऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र तिथे शाळाच कुलुंबबंद होती. वारकऱ्यांना त्यांचे साहित्य वाहनतळाच्या जागेत ठेवण्यास सांगण्यात आले.

जागा अपुरी पडू लागल्याने मग वारकऱ्यांनी वाहनतळाच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे रस्त्यावरही पथारी अंथरली.
शाळेची किल्ली कोणाकडे आहे हे स्थानिक स्तरावरही कोणाला माहिती नाही. शिक्षण मंडळाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी ही शाळा आमच्या ताब्यातच नाही असे सांगण्यात आले. शाळाच ताब्यात नसल्याने किल्लीचा प्रश्नच नाही असेही एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. भवानी पेठेतील आधीच्या शाळेत नेहमी मुक्काम करणारे वारकरी येत असल्याने संख्येत वाढ होती. कुठे रहायचे अशी विचारणा ते करत होते.

मुक्कामाचे ठिकाण नसावे ही वाईट गोष्ट आहे. शाळेची व्यवस्था करणे हे शिक्षण मंडळाचे काम होते. आधीची शाळा आगीमुळे व्यवस्थित नव्हती तर पर्यायी व्यवस्था मंडळाने करायला हवी होती. त्यांना तसे सांगायला हवे होते. यातील काहीच झालेले नाही. शाळेची किल्ली कोणाकडे आहे हे माहिती नसणे तर आश्चर्यकारकच आहे.

अविनाश बागवे (माजी नगरसेवक)

या शाळेची इमारत शिक्षण मंडळाकडे हस्तांतरीत झालेली नाही. मी बैठकीसाठी म्हणून मुंबईत मंत्रालयात आहे. तरीही वरिष्ठांबरोबर यासंदर्भात संपर्क साधला आहे. व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत. इमारतच आमच्या ताब्यात नाही तर किल्ली तरी कशी असेल?

- मिनाक्षी राऊत (प्रशासन प्रमुख, शिक्षण मंडळ)

Web Title: Ashadhi Wari Locked school Warkari facing problem living conditions Bhawani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.