Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 14:38 IST2023-06-22T14:26:43+5:302023-06-22T14:38:30+5:30
सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकीहून इंदापूर शहरात आगमन झाले...

Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण
इंदापूर (पुणे) : रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण पार पडले. निवलेल्या निळ्याशार नभाखाली, तलम गरम लाल मातीच्या मखमलीवरुन विद्युत वेगाने धावणारा कृष्ण अश्व... 'ग्यानबा तुकारामा'चा होत असणारा जयघोष....टाळ चिपळ्या, मृदंगांच्या अंगात भिनणाऱ्या लयीच्या साथीने अश्वाची दौड पहाणारे भाविक व वारकरी गण...यामुळे सारे वातावरण भारून गेल्याचा सात्त्विक अनुभव आज इंदापूरकरांनी घेतला.
सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकीहून इंदापूर शहरात आगमन झाले. श्रीराम वेशीमध्ये पालखी आली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या रिंगण सोहळयासाठी सर्व जण कदम विद्यालयाच्या प्रांगणात आले. मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पूजन झाल्यानंतर रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. तुळशीवाल्या,पताकावाल्या महिला,मृदुंगधारे वारकरी यांचे रिंगण झाले. पोलीस कर्मचारी धावले. त्यानंतर चित्तथरारक अश्वरिंगण झाले. पालखी नवीन पालखी तळाकडे रवाना झाली.