Ashadhi Wari: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत संविधानाचा जागर
By रोशन मोरे | Published: June 17, 2023 05:24 PM2023-06-17T17:24:20+5:302023-06-17T17:28:27+5:30
या दिंडीच्या माध्यमातून संविधानात असलेली मूल्य आणि संतांनी सांगितलेली वचने, अभंग यांचा परस्पर संबंध कसा आहे याची जाणीव करून देत जागृती केली जात आहे...
उंडवडी (पुणे) : जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये मागील पाच वर्षांपासून कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नुर यांच्या नेतृत्वाखाली 'संविधान समता दिंडी' सामील होत आहे. या दिंडीच्या माध्यमातून संविधानात असलेली मूल्य आणि संतांनी सांगितलेली वचने, अभंग यांचा परस्पर संबंध कसा आहे याची जाणीव करून देत जागृती केली जात आहे.
संविधान दिंडीत पायी चालत असताना दिंडीत सहभागी झालेल्या पुरोगामी संघटनांच्या कार्यकत्यांकडून पथनाट्याद्वारे संविधानामधील समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बंधुत्व ही मूल्य वारकरी पंथातील संतांच्या विचारांशी कशी सुसंगत आहेत हे उदाहरणासह पटवून देत आहे.
यारे यारे लहान थोर
याती भलते नारी नर
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा दाखला देऊन संविधानामधील 'समता' या मूल्याशी त्याची सांगड घालून ती वारकऱ्यांना सांगितली जात आहे. तर तसेच संविधानातील मुल्य आणि संताचे विचार कसे सुसंगत आहेत हे सांगितले जाते. प्रा. सुभाष वारे, शरद कदम, वर्षा देशपांडे, नागेश जाधव, अविनाश पाटील हे संविधान समता दिंडीच्या आयोजनात महत्वाची भुमिका बजावतात. तर दिंडी सहभागी होणा-या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांशी समन्वाची जबाबदारी दीपक देवरे, सरस्वती शिंदे, सुमित प्रतिभा संजय हे करत असतात.
एक दिवस तरी वारी अनुभवा
संविधान दिंडीची सुरुवात एक दिवस तरी वारी अनुभव या अनोख्या उपक्रमातून झाली. वारी विषयी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या धारणा असतात. तर कीर्तन करणाऱ्या काही महाराजांविषयी संविधानाविषयी चुकीचे आक्षेप असतात. हे दोन्ही दूर झाले पाहिजे या भूमिकेमधून एक दिवस वारी अनुभवा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असे शामसुंदर महाराज यांनी सांगितले