बैलजोडी ऐवजी हाताने पालखीरथ ओढणारा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:34 AM2023-06-20T11:34:02+5:302023-06-20T12:23:12+5:30
गेली १६ वर्षापासून ही परंपरा भाविकांनी जोपासली आहे...
-प्रकाश शेलार
केडगाव (पुणे) : पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३०० पेक्षा जास्त दिंडी सोहळे निघाले आहेत. प्रत्येक पालखी रथासाठी खास खिल्लारी बैल जोडी खरेदी केली जाते. परंतु कोळगाव डोळस तालुका दौंड येथील संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा पालखी रथ ओढण्याचे काम हे भाविक भक्तिभावाने करत असतात. गेली १६ वर्षापासून ही परंपरा भाविकांनी जोपासली आहे. यासाठी आनंदगड संस्थांनी आवर्जून छोटा रथ बनवला आहे.
अंदाजे ५०० किलो वजनाचा भाविक आळीपाळीने पंढरीच्या वारीकडे नेत असतात. भाविकांनी पालखी रथ ओढण्याचा हा महाराष्ट्रातील एकमेव सोहळा आहे. दिवसभर वीस ते पंचवीस किलोमीटर पल्ल्याचे अंतर भाविक आळीपाळीने सहभागी होऊन पालखी रथ ओढतात. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. आज सोहळा सायंकाळी पडवी ( ता.दौंड ) येथे मुक्कामासाठी विसावला. पालखी सोहळ्याचे काल कोळगाव डोळस ( ता.शिरूर ) येथून प्रस्थान झाले होते. राजाराम महाराज जगताप व विद्याताई जगताप यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी आलेगावचे सरपंच आप्पासाहेब बेनके उद्योजक राहुल करपे, ठेकेदार दत्तात्रय शेलार, राधिका जगताप, गुरुदास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांना संस्थांच्या वतीने मोफत साड्या वाटप करण्यात आले.
सोहळ्याचे हे १७ वे वर्ष आहे. कीर्तनकार राजाराम महाराज जगताप व विद्याताई जगताप हे सोहळा प्रमुख आहेत. कोळगाव येथील आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेतील १७ विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सोहळ्यात वैद्यकीय सुविधा व फिल्टरचे पाणी वारक-यांना दिले जाते. १३ दिवसांनंतर आषाढी एकादशीला सोहळा पंढरपुरात पोहचणार आहे. सोहळ्यात रोज हरिपाठ, प्रवचन व कीर्तन होत असते. पडवीत सोमवारी रात्री प्रतापमहाराज चव्हाण यांचे कीर्तन झाले. सोहळ्यात जे कीर्तनकार चालतात त्यांचीच कीर्तने होतात. सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे.
Pune: बैलजोडी ऐवजी हाताने पालखीरथ ओढणारा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा#AshadhiWaripic.twitter.com/9Lt3Nwks0V
— Lokmat (@lokmat) June 20, 2023