Ashadhi Wari : आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:01 PM2023-06-10T21:01:19+5:302023-06-10T21:02:52+5:30
Ashadhi Wari: तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला.
- भानुदास पऱ्हाड
आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला. तर काही भाविक इंद्रायणी नदीत स्नान करून थंडावा मिळवताना पाहायला मिळाले. शनिवारी (दि.१०) दुपारच्या सत्रात उन्हाचा पारा पस्तिशी पार गेला होता. अगदी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत सुर्यदेवता आग ओकत होता.
सध्या पावसाळा हंगाम सुरू झाला आहे. सद्यस्थितीत मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सुर्यदेवता उष्णतारुपी आग ओकत आहे. त्यातच वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. इंद्रायणी नदीवरील दर्शनबारीवर पांढरे कापड टाकल्याने दर्शनास जाणाऱ्या वारकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.
ऐन प्रस्थान सोहळ्याच्या आदल्या दिवशी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. मात्र उन्हाच्या तिव्रतेमुळे अनेक वारकऱ्यांना प्रदक्षिणा पूर्ण करता आली नाही. दुपारच्या सत्रात नेहमीपेक्षा इंद्रायणी तीरावर भाविकांची गर्दी कमी होती. अनेक वारकऱ्यांनी सावलीला बसून राहणे पसंत केले. शहरातील सिध्दबेट, विश्रांतवड, आश्रम, विविध संस्था, धर्मशाळा, मंगल कार्यालये, राहुट्या, आणि मोठ्या झाडांखाली वारकरी आराम करत होते. सायंकाळी साडेसहानंतर प्रदक्षिणा मार्ग वारकऱ्यांच्या गर्दीने गजबजून निघाला. तर इंद्रायणी घाटावरही दुपारच्या तुलनेत गर्दीत वाढ झाली.