Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून विसर्ग; शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:47 PM2023-06-23T12:47:21+5:302023-06-23T12:50:26+5:30
उजनी धरणातून आषाढी वारीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे...
बाभुळगाव (पुणे) : आषाढी वारीसाठी राज्यभरातून तसेच देश-विदेशातून भाविकभक्त पंढरपूरमध्ये येत असतात. त्यांच्या सोईसाठी उजनी धरणातून बुधवारी (दि. २१) सकाळी नऊ वाजता एक हजार पाचशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.
पाऊस लांबलेला असताना नदीपात्रात पाणी सोडल्याने उजनी धरणापासूनपंढरपूरपर्यंतच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे उजनी धरणातील पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने धरण पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी मात्र धास्तावलेला आहे. यंदा पावसाने अद्यापही दडी मारलेली आहे. यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. यामध्येच उपसा सिंचन योजना, कालवा, तसेच सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले. यासह वाढत्या उन्हामुळे दर महिन्याला उजनी धरणातील जवळपास एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यातच आता आषाढी वारीच्या निमित्ताने बुधवार (दि. २१)पासून भीमा नदीला पाणी सोडले आहे.
या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भीमा नदीपात्र गेल्या काही दिवसांपासून कोरडे पडले होते. भीमा नदीकाठच्या पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे. असे असताना दुसरीकडे धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रांतर्गत असलेला बळिराजा मात्र धास्तावलेला आहे. आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे सध्या उजनी धरण मध्ये असले तरीही नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले आहे.
उजनी धरणाची २१ जून सकाळची पाणीपातळी
एकूण पाणीपातळी ४८८.७० मीटर
एकूण पाणीसाठा ४७.८० टीएमसी
उपयुक्त साठा वजा १५.८६ टीएमसी
टक्केवारी वजा २९.६१ टक्के
उजनी धरणातून आषाढी वारीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.