Ashadi Vaari 2022: पालखी मार्गांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:14 AM2022-05-26T08:14:47+5:302022-05-26T08:20:46+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे संबंधित यंत्रणांना आदेश...
पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा पुन्हा होणार असल्याने सध्या सुरू असलेली पालखी मार्गाची कामे १० ते १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
या बैठकीला पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळा दोन वर्षांनंतर होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याचा अंदाज असल्याचे सांगून देशमुख म्हणाले, पालखी मार्ग, पालखी मुक्काम या ठिकाणच्या लक्षात आलेल्या सर्व त्रुटी १० जूनपर्यंत दूर कराव्यात.
प्रसाद म्हणाले, गेल्यावर्षीपेक्षा दीडपट अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज, पुरेसे पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर रुग्णालयांतील खाटा आरक्षित करणे, पुरेसा औषध पुरवठा आदी आरोग्य सुविधा केल्या आहेत.
देऊळवाड्याबाहेरील अतिक्रमण काढावे
ढगे म्हणाले, देऊळवाडा येथील किमान ३० मीटर जागा मोकळी असल्यास वारकऱ्यांना प्रदक्षिणा घालणे सोईचे होते. तेथील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. सासवड येथील उड्डाणपुलाचे अर्धवट काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे. पिसोर्डी येथील रेल्वे लाईनवरील विद्युतीकरण माऊलींच्या रथासाठी अडचणीचे आहे. पालखी मार्गावरील पालखी तळांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जेजुरी येथील पालखी तळ यंदाच संस्थानच्या ताब्यात आला आहे. तेथील व्यवस्था कशी असावी, याबाबतचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तेथे तात्पुरता चौथरा उभारण्याचेही सुचविले आहे.
झाडांची सावली हरवली
वारकऱ्यांना सुविधा व्हावी, यादृष्टीने काही मु्क्काम आम्ही गावाबाहेर घेतले आहेत. यंदा एक तिथी वाढल्याने इंदापूर येते एक जादा मुक्काम होणार आहे. सध्या पालखी मार्गाच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्त्याच्या कडेच्या झाडांची तोड झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना विसाव्याच्या ठिकाणी सावलीची सोय उरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यांच्या कडेला देशी झाडे लावावीत, अशी अपेक्षा माणिक महाराज मोरे यांनी व्यक्त केली.