अशोक चव्हाणांना राग आला, तरी खरे बोलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:01+5:302021-05-16T04:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मराठा आरक्षणाबद्दल खरे बोलल्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना राग आला. पण त्यांना राग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मराठा आरक्षणाबद्दल खरे बोलल्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना राग आला. पण त्यांना राग येतो म्हणून मराठा आरक्षणाच्या विषयात गप्प बसणार नाही,” असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
माझे मानसिक संतुलन बिघडल्याची काळजी चव्हाणांनी करू नये, असेही पाटील म्हणाले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित परिचारिकांच्या गौरव सोहळ्यानंतर शनिवारी (दि. १५) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, “सामान्य मराठा माणसाच्या मनात हे बिंबले आहे की, या सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात एक परिच्छेद आहे. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद मिळाला नसल्याचे म्हटले आहे. निर्णयाच्या एक परिच्छेदात असेही आहे की, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार नव्हते. परंतु स्थगिती न देता खटला चालवू म्हटल्यानंतर महाविकास सरकारने प्रत्येक वेळा तारीख मागितली. अखेर नाईलाजाने न्यायालयाला स्थगिती द्यावी लागली.”
सामान्यतः कायद्याला स्थगिती मिळत नाही. पण राज्य सरकारकडून चालढकल चालू असल्याचे न्यायालयाच्याही ध्यानात आले. ते म्हणाले, “कोरोनाचे संकट असले तरी मराठा तरुण-तरुणींना संताप व्यक्त करण्यापासून रोखता येणार नाही. कोरोनाचे नियम पाळून त्यांना आंदोलन करू द्यावे. एकीकडे सत्ताधारी आमदारांना निधी देता, तुमचे राजकारण चालू ठेवता आणि दुसरीकडे मराठा तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरू नका म्हणता. पण ते ऐकणार नाहीत.”
चौकट
तीन हजार कोटींचे पॅकेज द्या
“मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या. हे पॅकेज देण्याबाबत न्यायालयाने सरकारला अडवलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, मराठा आरक्षण रद्द झाल्याने समाजाचे होणारे नुकसान भरून देऊ. तर ते भरून द्या, असेच आमचे म्हणणे आहे.”
-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
चौकट
भांडणे चव्हाट्यावर येणारच
“अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणे व नाराजी आहे. आपसांतील भांडणे कधी तरी चव्हाट्यावर येणारच. सध्या जलसंपदा विभागाशी संबंधित काही विषय समोर आले आहेत. अशा अनेक घटना आहेत. आगामी काही दिवसात त्या दिसतील,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.