इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:42 AM2019-01-22T02:42:35+5:302019-01-22T02:43:03+5:30
इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
बिजवडी : इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. कारण, हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, आमचेही ते नेते आहेत असे चव्हाण म्हणाले. आगामी लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याचे संकेत मिळत आहेत अशी माहितीदेखील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
चव्हाण हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी बावडा येथे आले होते. त्यानंतर परतीच्या मार्गावर चव्हाण यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या, तरी आम्ही दोन्ही निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास आमची काहीही अडचण निर्माण होणार नाही. आम्ही त्या निवडणुका हिमतीने लढवून दाखवू, जिंकून दाखवू असे चव्हाण म्हणाले. पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा अद्याप निर्णय झाला नाही.
या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, कर्मयोगी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार व शरद काळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
>नारायण राणे हे काँग्रेस पक्षात येणार आहेत असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, मला त्याबाबत काहीही माहिती नाही.
माझ्याशी त्याबद्दल नारायण राणे व बाळासाहेब थोरात काहीच बोलले नाहीत. यापूर्वीच राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगत राणे यांना चिमटा काढला.