२३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर
By श्रीकिशन काळे | Published: December 11, 2023 02:55 PM2023-12-11T14:55:15+5:302023-12-11T14:56:48+5:30
अशोक नायगावकर हे मराठीतील एक प्रसिध्द व्यासपीठीय कवी आहेत
पुणे : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणेतर्फे आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलन यंदा दिनांक २३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरुड, पुणे येथे होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे.
अशोक नायगावकर हे मराठीतील एक प्रसिध्द व्यासपीठीय कवी आहेत. 'मिश्कीली व कविता' हा कार्यक्रम महाराष्ट्रासह देशभर तसेच महाराष्ट्र मंडळ, लंडन, न्यू कॅसल, कतार, दुबई, बॅन्कॉक, शिकागो अशा जगभरातील विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. शासनाच्या पुरस्कारांसह विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 'वाटेवरच्या कविता' हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह आहे. साहित्यिक कलावंत संमेलन अध्यक्षांची परंपरा खूप मोठी आहे. या यापुर्वी नारायण सुर्वे, डॉ. आ. ह. साळुंके, उत्तम कांबळे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. नरेंद्र जाधव, भारत सासणे, डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यासारख्या मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.