डेड बॉडी सडत होती, तरीही FTII प्रशासनाला कळलं कसं नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:35 PM2022-08-05T19:35:24+5:302022-08-05T19:40:01+5:30
प्राथमिक माहितीनुसार अश्विनला मानसिक आजार होता...
-किरण शिंदे
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत आज सकाळच्या सुमारास होस्टेलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला. तब्बल तीन दिवसांपासून या विद्यार्थ्यांचा मृतदेह सडत होता. इतका धक्कादायक प्रकार घडल्यानंतरही FTII मधील हॉस्टेल प्रशासन या घटनेपासून अनभिज्ञ होतं.
आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणेपोलिसांच्या कंट्रोल रूमला एक कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने FTII च्या होस्टेलमधील एका खोलीत आत्महत्येचा प्रकार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांचा एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला असता एका तरुणाचा मृतदेह त्यांना दिसून आला. अश्विन अनुराग शुक्ला असं मयत तरुणाचं नाव आहे. तो 32 वर्षांचा होता. होस्टेलच्या खिडकीला त्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचं प्रथम दर्शनी दिसून आले होते.
अश्विन मूळचा गोव्याचा. मागील तीन वर्षापासून तो FTII च्या हॉस्टेलमध्ये राहत होता. सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षाला तो शिक्षण घेत होता. अबोल आणि शांत असलेला अश्विन एकटा एकटा राहायचा. इतर विद्यार्थ्यांत मिसळणे त्याला आवडायचे नाही. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी त्याला मंगळवारी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर तो विद्यार्थ्यांना दिसलाच नाही. आज सकाळी तो राहत असलेल्या खोलीतून उग्र वास येत असल्याने काही विद्यार्थ्यांनी दरवाजावरून डोकावून पाहिला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
प्राथमिक माहितीनुसार अश्विनला मानसिक आजार होता. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्याला आपण स्वतः पायलट आहोत आणि आपलं विमान क्रॅश होते असे भास देखील झाले होते. तेव्हा त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. अश्विनचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. ते गोव्यातून पुण्याकडे येण्यास निघाले आहेत.
मात्र FTII सारख्या जगविख्यात संस्थेच्या हॉस्टेलमध्ये मृत्यू झाल्याच्या तीन दिवसानंतर ही हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. FTII मधील होस्टेलचे प्रमुख असतील किंवा अश्विनच्याच खोली शेजारी राहणारी इतर विद्यार्थी असतील त्यांच्याही लक्षात हा प्रकार कसा आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय? पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.