जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये एएसआयची रुग्णालये उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:28+5:302021-01-16T04:14:28+5:30
रांजणगाव गणपती : राज्यात नवीन उद्योगधंद्यात सुमारे १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, शासनाच्या वतीने एमआयडीसी ...
रांजणगाव गणपती : राज्यात नवीन उद्योगधंद्यात सुमारे १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, शासनाच्या वतीने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगधंद्याना पूर्णतः सहकार्य करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीसह चाकण व तळेगाव दाभाडे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांकरिता कामगार विमा योजना मंडळाचे (एएसआय) सुसज्ज रुग्णालये लवकर उभारण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) येथे रांजणगाव इंडस्ट्रिज असोसिएशनच्या नूतन वास्तूचे उदघाटन उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनब्लगन, उपअभियंता एस. एन. चौडेकर, रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बावेजा, उपाध्यक्ष वार्नर प्लॉनर, सचिव आर.डी. चौधरी, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, अमोल जगताप, बापूसाहेब शिंदे,संजय देशमुख आदिसह उद्योजक उपस्थित होते.
सुभाष देसाई म्हणाले, कोरोना काळात बंद असलेले राज्यातील उद्योगधंदे पुन्हा १०० टक्के पूर्ववत झाले असून, मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध झाला असून, उद्योगधंदे व स्थानिक भूमिपुत्र यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कंपन्या व स्थानिक ग्रामपंचायती यांचा योग्य संवाद राहण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने नेहमीच पुढाकार घेण्यात येईल.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, रांजणगाव एमआयडीसीची मुहूर्तमेढ १९९१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीपणामुळे रोवली गेल्याने शिरूर तालुक्यात मागील काही वर्षांत आर्थिक सुबत्ता मोठ्या प्रमाणात आली. अष्टविनायक रांजणगाव गणपती देवस्थानच्या ९६ एकर क्षेत्रावर अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून, लवकरच त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी देसाई व वळसे पाटील यांच्या हस्ते एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक दायित्व निधीसाठी योगदान देणाऱ्या कंपनी प्रतिनिधीचा यावेळी देसाई व वळसे पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
१५ रांजणगाव गणपती
इंडस्ट्रिज असोसिएशनच्या नूतन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित असलेले सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील व इतर.