साहित्य संमेलन : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबी विरोधात असीम सरोदे, विश्वंभर चौधरी बसणार उपोषणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:50 PM2019-01-07T19:50:09+5:302019-01-07T20:04:16+5:30
विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे : यवतमाळ साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याने सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. याबाबत विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय व्यवस्था, आयोजक, भूमिका न घेणारे साहित्यिक अशा घटकांचा निषेध नोंदवण्यासाठी संमेलनस्थळी एकदिवसीय उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार टाकण्याऐवजी तेथे जाऊन कृती कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. संमेलनाच्या मंडपात उपोषणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी साहित्य महामंडळाकडे केली आहे. एक दिवसाचे उपोषण आणि मौन सत्याग्रह असे या कृती कार्यक्रमाचे स्वरुप असेल.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘राजकारणमुक्त साहित्य व्यवहार निर्माण व्हायचा असेल, तर त्याला पोषक परिस्थिती कधी निर्माण होणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि झुंडशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही कृती कार्यक्रमाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात पुढचे पाऊल काय असणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. संयोजकांचा निषेध म्हणून आम्ही मंडपात आत्मक्लेश करणार आहोत. यातून कोणतीही चमकोगिरी करण्याचा हेतू नाही. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. यावेळी निषेधाची पत्रके वाटली जातील. यातून राजकीय पक्षांना आणि संयोजकांना धडा शिकवला जाणार आहे. साहित्यिकांना स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करता येत नसेल तर शारदेचा उत्सव केवळ नावापुरता राहिल, हा संदेशही कृती कार्यक्रमातून दिला जाईल.’
अॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘आयोजकांनी आमंत्रण मागे घेऊन मोठी चूक केली आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घ्यावे, असे आयोजकांना वाटत नाही. दबाव निर्माण करुन आपण मोठी चूक केली आहे, असे राजकीय नेत्यांनाही वाटत नाही. उदघाटनाला कोणाला बोलवायचे, बोलवायचे की नाही, या सर्वस्वी आयोजकांचा अधिकार आहे. मात्र, एकदा आमंत्रण दिल्यावर विशिष्ट राजकीय कारणांमुळे ते मागे घेऊन अपमानित करणे दुर्देवी आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच समजून घेतले नाही, तर लोकशाही कशी समजून घेणार, हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही दोघांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.’
प्रत्येकाने अशा पध्दतीने कृतीतून निषेध नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांना कळवण्यात आले आहे. ‘आम्ही दोघे जण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी बाहेर बसून एक दिवसाचे निषेध उपोषण आणि संध्याकाळी उपोषण सुटेपर्यंत मौन सत्याग्रह करण्याचे जाहीर करीत आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणा-या प्रवृत्ती विरोधात हे आंदोलन आहे’, असे त्यांनी नमूद केले आहे.