'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:57 AM2023-03-08T09:57:23+5:302023-03-08T09:57:31+5:30
लोकसभा आणि विधानसभेबाबत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेण्याचा प्रयत्न राहणार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांचे नाव पत्रकारांनी घेताच शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे म्हणत पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावत पाटील यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. कसबा पेठेतील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल, असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते; पण मला याची खात्री नव्हती. त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशिव, शनिवार पेठ हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे, असे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले होते. बापट यांचे वैशिष्ट्य असे की भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी बापट यांनी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यांनी निर्णय घेतला गेला नाही, अशी कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतल्यास त्याचे काय परिणाम होतील, अशी चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होतीच. परंतु लोकांनी निवडून दिलेली व्यक्ती वर्षानुवर्षे सामान्य लोकांमध्ये कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती. महाविकास आघाडीतील सर्व घटक याठिकाणी मनापासून राबले याचा हा परिणाम आहे, असे आमचे निरीक्षण आहे. महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय. उद्याची विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे, असेही पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी कसबा निवडणुकीत ज्यांचा विजय झाला ते उमेदवार महाविकास आघाडीचे होते हे तरी मान्य केले. निवडणुकीपूर्वी त्यांची वक्तव्य काय होती ते वाचनात आले होते त्यामध्ये आता थोडा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगले बोलतात, ही चांगली गोष्ट आहे. या निवडणुकीत भाजपने वाटलेले पैसे आणि केलेले गैरप्रकार हे पारंपरिक मतदारांना अजिबात आवडलेले नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
शेतकरी योग्य वेळी निर्णय घेतील
नाशिकच्या मनमाडच्या शेतकऱ्यांनी माझ्याशी बोलणे केले, त्यामध्ये कांदा खरेदी योग्य पद्धतीने सुरू नाही. कांद्याचे पडलेले भाव सावरण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. राज्य आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतले ते योग्य नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्याअर्थी अजूनही भावात सुधारणा होत नाही, याचे दु:ख शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याची किंमत शेतकरी योग्य वेळी वसूल करतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.