पुणेकरांनो, सर्व्हेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:43 PM2020-09-28T20:43:29+5:302020-09-28T20:48:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्यांकडे ओळखपत्र विचारा आणि काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नागरिकांना तत्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.
अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यांना भेटण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असून शहरातील गुन्हेगारी व इतर गोष्टींचा आढावा घेत आहेत. कोरोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत.
गुप्ता यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली अथवा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून घरात घुसत असल्याच्या काही तक्रारी कानावर आल्या आहेत. जर कोणी आपल्याकडे आले तर त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये़ अशा कोणी व्यक्ती घरात येण्याचा प्रयत्न करु लागल्या तर त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारा़ संशयास्पद वाटल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. नागरिकांना पोलीस लगेच मदत करतील.
...................
सुरक्षित वातावरण तयार करण्यावर भर
शहरात गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटले, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर जसे रात्री उशिरापर्यंत महिला सुरक्षितपणे वावरत असतात. तशाच प्रकारे पुण्यातील महिलाही सुरक्षितपणे वावरतील असा कायदा व सुव्यवस्थेचा धाक ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी बेसिक पोलिसिंगवर भर राहणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.